Wednesday 7 August 2013

"क" कसा करतो कमाल

57वी- अनुदिनी

327वा- दिवस



मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द ''क'' पासून सुरु करुन एवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या इतर कोणत्याही भाषेत अशी ताकद असेल ??? असे तर काही वाटत नाही !! वाचा तर मग मराठी भाषेचा चमत्कार... आणि "क" कसा करतो कमाल:220px-Devanagari_k.svg.png

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवनेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच ! काकूंनी कर्णकर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करण काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपडेन- कपडे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपड्यांचे काकांनी ''कोलाज'' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवलाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवले. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवने कितीतरी काबाडकष्ट केल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवला काळानेच केले 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार:- ''क्रियेविण करिता कथन,किंवा कोरडेची कीर्तन, किताब कष्टाविण,काय कामाचे''


अद्ययावत (१३ एप्रिल २०१६): सदर लेख मी दिनांक ७ ऑगष्ट २०१३ रोजी या अनुदिनीवर तेव्हा सुरु एका उपक्रमांतर्गत निनावी  प्रसिद्ध केला होता. अर्थात मला तो निनावी पाठवण्यात आला होता. परंतु असे करण्यामागे मुळ दोन कारणे म्हणजे मला मुळ लेखकाची माहिती नव्हती. अन्यथा माझा उद्देश मुळ लेखकाचे श्रेय लाटून घेणे हा कदापि नव्हता. हे अद्ययावत करण्याचे कारण म्हणजे मला हि पोस्ट या अनुदिनीवर निनावी प्रसिद्ध केल्यामुळे मूळ लेखकाची ईमेल द्वारे दिनांक १३ नोव्हेंबर २०१५ रोजी तक्रार आली होती. तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे मी या अनुदिनी लेखात हि सुधारना करू न शकल्याबद्दल क्षमा मागून हि सुधारणा करू ईच्छितो.
सदर कथेचे मुळ लेखक हे श्री शंतनू भट  हे असून त्यांनी हि कथा माझ्या अनुदिनीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी खूप अगोदर त्यांच्या स्वत:च्या अनुदिनी काव्य-शास्त्र-विनोद  वर कोल्हे कुई  या नावाने प्रसिद्ध केलेली होती. करिता सदर कथेचे सर्वाधिकार मुळ कथाकार शंतनू भट यांच्याकडे सुरक्षित आहेत. 

-राजेश डी. हजारे

-7 ऑगस्ट 2013 (आमगाव)

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com