Wednesday 27 November 2013

TO THE LAST BULLET on 26-11 (#BookLysis)


  • दिवस ४३० वा
  • अनुदिनी ८२वी 
  • दुसरी पुस्तक समीक्षा

मित्रांनो सौ. विनीता अशोक कामटे व सौ. विनीता विश्वास देशमुख लिखित श्री भगवान दातार अनुवादीत "To The Last Bullet" (टु द लास्ट बुलेट) हे २६ /११ तील शहीद DIG IPS अशोक एम. कामटे यांचे जीवनचित्रण वाचून काढले.. हे पुस्तक वाचताना मला आलेले अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात... 

मित्रांनो मला फक्त माहिती होतं कि २६ /११ वर आधारित 'To The Last Bullet' हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालंय पण खरं सांगायचं तर ते विकत घेण्याचा कधी विचार मनात आला नाही..
Book Cover of TO THE LAST BULLET (Source: ArbitBansal-Book Reviews)
२  सप्टेंबर २०१३ ला नागपुरला असताना नाथे बुक डिस्ट्रीब्युटर्स कडे सदर पुस्तक शिक्षकदिनानिमित्त ६  सप्टेँबर पर्यँत १५ % सवलतीत उपलब्ध होतं.. मी फक्त पाने चाळून पाहिली व पुस्तक न घेताच परतलो.. पण मला हि पुस्तक काही सोडेना.. अर्थात या पुस्तकाचाच विचार माझ्या मस्तिष्कचक्रात सतत फिरत होता.. अखेर त्याच डिस्ट्रीब्युटर्सच्या दुसऱ्या  दुकानातून मी शेवटी "टु द लास्ट बुलेट" विकत घेतली.. त्यांच्याकडे त्यावेळी  मुळ इंग्रजी आवृत्ती उपलब्ध नसल्याने शेवटी नाईलाजास्तव मराठीत अनुवादीत पुस्तक खरेदी केली... 
आता पुस्तकाविषयी :

BaDf3hyIEAANWcd.jpg
टू  द लास्ट बुलेट  चे मुखपृष्ठ 
"टु द लास्ट बुलेट" चं मुखपृष्ठच वाचकांना (व माझ्यासारख्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम करणाऱ्या पुस्तकवेड्यांना) खुप आकर्षित करतं.. शहीद IPS अशोक कामटेंचं वर्दीतील ते प्रभावशाली छायाचित्र व "टु द लास्ट बुलेट" च्या 'बु' ला छेदणाऱ्या बुलेट (गोळी)मूळे निघालेलं रक्तं...! इतकच ते पुस्तक खरेदी करण्यास पुरेसं वाटतं.. यावरुनच आतल्या मजकुराची कल्पना येते (तशी २६ /११ च्या प्रसंगाची कल्पनाही करवत नाही..) व मलपृष्ठावर थोडक्यात २६ /११, अशोक कामटे व या पुस्तकाविषयी माहिती दिलीय..

"टु द लास्ट बुलेट" ला २६ /११ तच शहिद एटीएसचे प्रमुख IPS हेमंत करकरे यांच्या पत्नी सौ. कविताताईँची भावस्पर्शी प्रस्तावना आहे.. पुस्तकाच्या संभाषिका (Narrator) सौ. विनीता कामटेँनी हृदयस्पर्शी 'हृद्गत' व सहलेखिका म्हणून 'इंटेलिजन्ट पुणे' साप्ताहिकाच्या संपादिका सौ. विनीता विश्वास देशमुख यांचे मनोगत आहे... माझ्या मते तरी IPS हेमंत करकरे व IPS अशोक कामटे या जगातून कुठेही गेलेले नाहीत.. ते मृत झाले नाही तर त्यांनी देशासाठी वीरमरण पत्करलं.. ते शहीद हुतात्मे झाले.. आणि आपण नेहमीच मानतो.. "Mentors never die!"

पुस्तक सौ. देशमुख यांनी अशाप्रकारे लिहिली जणू सौ. कामटे ही कहाणी जगाला स्वत: सांगत आहेत.. ते सत्यही आहे.. तरी त्यांनी इतकं सहज लिहिलं कि त्यांनी कुठेही संवाद सांगणाऱ्या व्यतीरिक्त लेखिका म्हणून स्वत:चा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेखही येऊ दिला नाही.. होऊ शकतं याला एक कारण वा योगायोग हाही असावा की कहाणी सांगणाऱ्या व लिहिणाऱ्या दोन्ही लेखिका-सहलेखिका या 'विनीता'च आहेत... पुस्तकातील प्रकरणांविषयी लिहिण्यापुर्वी मला या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करणारे अनुवादक श्री भगवान दातार यांच्या अनुवादनाची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही.. कारण त्यांनी हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं म्हणूनच नव्हे तर इतकं उत्तम अनुवादीत केलं की मला क्षणभरासाठीदेखील असं वाटलं नाही की सदर पुस्तकाची ही मुळ इंग्रजीतील प्रत नसून मराठीत भाषांतरीत आहे.. अगदी यथायोग्य पण तितक्याच तडफदार व आवश्यक तिथे भावस्पर्शी शब्दांचा वापर केलेला आहे.. किँबहूना मी असं म्हणण्यास हरकत नाही की मी आजवर वाचलेल्या कितीतरी मराठीत अनुवादीत पुस्तकांपैकी "टु द लास्ट बुलेट" हे सर्वोत्कृष्ठ मधलं एक आहे...

पुस्तकाच्या अंतरंगाविषयी :

mumbaiAttack2008_2258195b.jpg

"टु द लास्ट बुलेट"चे 'ती काळरात्र...' हे पहिलेच प्रकरण वाचत असताना २६/११ चे ते भीषण चित्र माझ्या डोळ्यापुढे तरळत होतं.. अंगावरील काटे शहारुन निर्माण होऊ लागले होते व रोम-रोम जोशाने भरलं होतं.. कित्येक वेळा तर या एकाच प्रकरणात हुंदके देत रडायची देखील ईच्छा झाली..

'अखेरचा प्रवास' या दुसऱ्या प्रकरणातलं एक वाक्य मला उद्धृत करावासा वाटतो तो म्हणजे शहीद IPS अशोक कामटेंचा नोकरी (परिहार्याने) देशाभिमान-- "मला अपघातातला मृत्यु नको आहे. एखाद्या कामगिरीवर असताना मी आनंदानं मरणाला सामोरा जाईन..." २६ /११/२००८  रोजी त्यांनी तसंच भारतातील सर्वात मोठ्यातल्या एका कामगिरीवर असताना वीरमरण पत्करलं..

'राग, वेदना आणि निर्धार' मध्ये एका देशावर प्रेम करणाऱ्या, देशासाठी लढणाऱ्या व त्यातच मरण पत्करणाऱ्या एका शुर पतीविषयी एका वीरपत्नीचा अभिमान व प्रेम आपल्या लक्षात येईल...

'सत्य कोणी सांगेल का?' या चौथ्या प्रकरणात २६ /११  हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या कार्यवाही व कारवाई बाबत संभ्रमात पाडणारे असंख्य प्रश्न व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी एका वीरपत्नीचे धडाडीचे प्रयत्न व त्यांना मिळालेला विचित्र प्रतिसाद लक्षात येईल.. पण तीच वस्तुस्थिती आहे.. पण खरं सांगतो अशोकजींच्या जाऊन चार-पाच वर्षे लोटल्यानंतर सुद्धा मला सोलापुर व मुंबईत तसं काही घडलं असेल असं क्षणभरदेखील जाणवलं नाही.. कामटे सरांनी तिथे प्रशासकीय व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवून ठेवलीय ती आजही अबाधित आहे.. याच प्रकरणात आयपीएस श्यामराव दीघावकर, संजय जाधव, विविध पोलिस, कर्नल संजय अनिशा आणि सुनिल सदरंगानी तसेच उद्योजक यतीन शहा यांनी कामटेँबद्दल सांगितलेल्या आठवणी आहेत...

नवव्या प्रकरणात 'भंडारा पोस्टीँग' मध्ये कामटे यांनी 'नक्षलवाद्यांवर प्रहार' कसा केला ते नमूद केलंय.. तसं पाहता तेव्हाच्या भंडारा जिल्ह्याचे १  मे १९९९  रोजी विभाजन होऊन गोँदिया जिल्ह्याची निर्मिती झालीय.. मी गोँदिया जिल्ह्याचाच.. आणि खरंतर राहण्याचं ठिकाण आमगाव सोडलं तर ज्या नक्षली क्षेत्रांची पुस्तकात नोँद आहे ते बहूतेक सर्वच आज गोँदिया जिल्ह्यात मोडतात.. मग देवरी व अर्जुनी मोरगाव हे तालुके असोत वा नवेगावबांध व नागझिरा अभयारण्य ही पर्यटन स्थळे..! सौ. विनिता कामटे यांनी स्वत:चे भंडाऱ्याचे खुप ग्रामीण किँवा मागासलेलं क्षेत्र/जिल्हा असं वर्णन केलं आहे.. त्यांनी केलेलं वर्णन वाचून मला हसु येत होतं.. कारण खरंच हे क्षेत्र पुर्वी तसच राहीलं असावं.. मात्र आज परिस्थिती थोडी बदललीय.. विदर्भातील भंडारा व गोँदिया हे दोन्ही नक्षलग्रस्त जिल्हे झपाट्याने विकास करताहेत.. हं मात्र नक्षली प्रश्न आहे तो अगदी तसाच.. हं भीतीचं कारण आताही असलं तरी पुर्वीसारखा नाही.. आमच्याच चाळीत एक आमगाव पोलिस स्थानकात कार्यरत पोलिस हवालदार गणेश शेँडे राहतात.. त्यांनी पण IPS अशोक कामटेँच्या कारकिर्दीतील बहुतेक किस्से सांगितले.. "एक धिप्पाड, कुणाला न घाबरणारे व सर्व गुंडांवर जरब बसवणारे पोलिस अधिकारी म्हणून.. ते बाहेर आले की कुणी गुंड तर सोडा साधा मवाली देखील शर्टाची बटन खुली ठेवत नसे.. मग कॉलर तर सोडाच.." या प्रकरणात आयपीएस श्री पद्मनाभन यांनी सांगितलेली आठवण दिलीय..

दहाव्या प्रकरणात चि. अशोक व कु. विनिता यांच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगापासून तर लग्नापर्यँतची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट तितक्याच प्रेमानं नमूद केलीय.. ज्यावरुन कणखर पोलिस अधिकाऱ्यातील प्रेमळ पतीचं दर्शन होतं..

गणेश चतुर्थीच्या दिवशी ९  सप्टेँबरला सकाळी साडेसात पासून वाचन सुरु केल्यानंतर दहा-साडेदहा पर्यँत केव्हा "टु द लास्ट बुलेट"ची संपुर्ण २३१  पृष्ठे वाचुन झाली काही कळलेच नाही.. 'सुखद सातारा'  या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील नयनरम्य हवामानाचं वर्णन वाचून स्वत:च पर्यटन केल्यासारखं वाटतं..
आयपीएस विनीत अगरवाल यांनी सांगितलेल्या अनुभवांनंतर शहीद अशोक कामटेँचे आदर्श आजोबा स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईचे पहिले इंस्पेक्टर जनरल (IG) स्व. IPS नारायणराव मारुतीराव कामटे यांच्या कारकिर्दीविषयी त्यांनी त्यांच्या "From Them To Us" या आत्मचरित्रात सांगितलेले अनुभव उद्धृत केलेले आहेत.. यावरुन कळतं कि प्रशासकीय कार्य हा अशोकजीँना कामटे 'घराण्याचा वारसा' म्हणूनच मिळाला होता की काय जणू... या प्रकरणात अशोकजीँच्या पणजोबा मारुतीराव, आजोबा नारायणराव व वडील लेफ्टनंट कर्नल मारुतीराव कामटे तसेच त्यांच्या आईचे वडील डॉ. एच. एस. बावा यांचा थोडक्यात परिचय करुन दिलाय.. 'सांगली पोस्टीँग' मध्ये अशोक कामटे कसे 'बेडर अधिकारी' होते ते दिसून येते.. 'बोस्निया पोस्टीँग' मध्ये अशोकजीँची 'परदेशातील कामगिरी' व्यक्त केलीय..

पंधराव्या प्रकरणात आपल्याला कळतं की अशोकजींसाठी 'खेळ ही उर्मी आणि फिटनेस हा ध्यास' होता.. खेळ, फिटनेस आणि वेळेचं त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व होतं! IPS अशोक कामटे कसे तल्लख बुद्धीचे अभ्यासू विद्यार्थी व सर्वच खेळात प्राविण्यप्राप्त खेळाडू होते..

पुढील प्रकरणात त्यांच्या कुटूंब व मित्रांविषयी वर्णन केलंय की इतके मोठे अधिकारी असूनही ते कसे मनमिळाऊ मित्र होते.. पुढे लुईस मांटा, योशियुकी फुजिशिमा, डग्लस कुडिन्हो व आताचे मुंबई सायबर क्राईम गुन्हे शाखेचे जॉईन्ट कमिशनर ऑफ पोलिस आयपीएस श्री हिमांशु रॉय यांनी अशोकजी सोबतच्या मैत्रीचे किस्से सांगितलेत...

'शस्त्रनिपुण' या प्रकरणात वाचकांना कळून चूकतं की नानाविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल ज्ञान व कुतूहल आणि ती शस्त्रे हाताळण्यात ते किती कुशल होते... अशोकजींचं शस्त्रांवरील प्रेम! तसंही पहिल्याच प्रकरणात आपल्या वाचनात येतं की आयपीएस फ्रान्सिस अरान्हा (जे अशोक कामटेँच्या नोकरीतील पहिले पोलिस अधिक्षक/SP होते) यांनी योगायोगाने २६ /११ /२००८  रोजीच त्यांना विचारलं होतं- "तुझा देवावर विश्वास आहे?" त्यावर IPS अशोक कामटेंचं उत्तर होतं- "नाही! माझा फक्त शस्त्रपुजेवर विश्वास आहे." तरी या प्रकरणात प्रा. डॉ. दीपक राव यांनी अशोक कामटेँच्या शस्त्र नैपुण्याबद्दल विशेषत्वानं लिहून ठेवलय..

"का जवानांनी मिटले डोळे,
आतंकाशी लढताना
शेवटी मी श्रद्धांजली देतो,
अमुच्या शहीदांना
2008 मध्ये अजरामर झाली
26 अकराची कहाणी" -RDH

'सत्याची उकल' या प्रकरणात जे व्यक्ती २६/११  च्या पोलिसी कारवाईबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांना संपुर्ण कारवाईचे चित्र समजेल.. २६/११  ला मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई, शहीद IPS अधिकारी हेमंत करकरे व अशोक कामटे, शहीद मेजर संदिप उन्नीकृष्णन, शहीद पोलिस निरीक्षक विजय साळसकर, शशांक शिंदे, शहीद पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, बापूसाहेब दुरूगडे, शहीद सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम ओंबळे, बाळासाहेब भोसले, शहीद पोलिस हवालदार एम. सी. चौधरी, शहीद NSG कमांडो गजेंद्र सिंग, शहीद पोलिस शिपाई जयवंत पाटील, विजय खांडेकर, अरूण चित्ते, योगेश पाटील, अंबादास पवार, शहीद SRPF शिपाई राहूल शिंदे आणि शहीद गृहरक्षा शिपाई मुकेश जाधव आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, साहस व शौर्य तसेच देशासाठी दिलेलं बलिदान आणि मुख्य कंट्रोलरुमकडून झालेली दिरंगाई, टाळाटाळ व चुका या सर्व बाबी सत्य म्हणून वाचकांसमोर येतात... जर हे पुस्तक बाजारात आलं नसतं तर सामान्य माणसाला याविषयी काहिही सविस्तर कळलं नसतं.. या प्रकरणाने बरेच सत्य उकरुन काढले आणि निर्माण केले असंख्य प्रश्नसुद्धा!

पुढील प्रकरणात कळतं की "माहितीच्या अधिकाराचे शस्त्र" काय आहे.. पण मला एक प्रश्न पडतो की ही कसली व्यवस्था आहे आपल्या देशात की एका शहीद आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला सुद्धा छोट्या-छोट्या बाबीतील सत्य शोधण्याकरिता या अधिकाराचा वापर करावा लागला..
'दंगली आणि चकमकी' या सातव्या प्रकरणात शहीद अशोक कामटे यांच्या कार्यशैलीची प्राथमिक ओळख होते...

मी बरीच पुस्तके वाचलीत पण एकच पुस्तक दररोज न चुकता वाचली असेल अशा फारच कमी अन् "टु द लास्ट बुलेट" हि त्यातलीच एक.. कारण एकच आता पुढे काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता.. आपण सर्वांनीच 'नायक' चित्रपट पाहिला असेल.. त्या चित्रपटाचा नायक शिवाजी गायकवाड (अभिनेता अनिल कपूर) एक दिवस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतो.. ८  सप्टेँबर २०१३  रोजी काही तास मला तसाच अनुभव आला.. मी ग्रॅज्युएट (पदवीधारक) होण्यापुर्वीच चक्क आयपीएस अधिकारी झालो होतो..! होय मी स्वत: सोलापूर, भंडारा आणि जिथे-जिथे शहीद अशोक कामटेँनी आयपीएस अधिकारी म्हणून ज्या-ज्या पदावर कामगिरी केली मी ते सर्व स्वत: अनुभवत होतो.. काही क्षणासाठी आयपीएस अशोक कामटेँच्या पात्रात स्वत:ला बघत होतो.. मग ते सोलापूरच्या गुंडांशी दोन हात करणं असो वा तेथील दंगली नियंत्रणात आणणं.. या प्रकरणात अशोक कामटेंच्या कार्यशैली व तेथील जनतेवर त्यांनी छोडलेली छाप अवर्णनीयच म्हणावी लागेल.. मी स्वत: मागील वर्षी मे २०१२  मध्ये 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' द्वारा आयोजित '१९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन' च्या निमित्ताने सोलापुरला जाउन आलो.. यावर्षी जुलै २०१३ मध्ये मी मुंबईला पण जाऊन आलो.. तिथे तर हल्ला झालेल्या 'नरीमन पॉईँट' परिसरातील गेट वे ऑफ इंडीया जवळील 'होटल ताजमहल', 'होटल ट्रायडंट ओबेराय' परिसरात पर्यटक व जनतेची नेहमीसारखी आजही वर्दळ सुरुच असते.. इतका भीषण हल्ला सोसल्यानंतरही वरील दोन्ही होटल व स्वप्नांचं शहर 'आमची मुंबई' (मी मुंबईकर नसलो तरी) आन-बान-शानेनं जशीची तशी उभी आहे.. अगदी २६ /११ ला काहीच न झाल्यासारखी.. स्वाभाविकच आता सुरक्षा यंत्रणाही काहिशी सावध झालीच असणार.. पण तितका भीषण हल्ला सोसूनही यत्किँचीतही न डगमगणाऱ्या मुंबईकरांना खरंच मनापासून सलाम!

Tukaram Ombale Statue.jpg
शहीद तुकाराम ओंबळे स्मारक (प्रेरणा स्थळ), गिरगाव चौपाटी, मुंबई  (छाया: ©राजेश डी. हजारे, जुलै २०१३ )
गिरगाव चौपाटीवर आता २६ /११ हल्ल्यात सहभागी अतिरेकी 'नरकीय' अजमल आमीर कसाब ला जीवंत पकडण्यासाठी वीरमरण पत्करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शहीद तुकाराम गो. ओँबळे यांचे स्मारक तिथेच 'प्रेरणा स्थळ' म्हणून उभे आहे.. ते अगदी नावाप्रमाणेच देशप्रेमाची प्रेरणा देते.. स्वतंत्ररित्या या स्थळासंदर्भात लिहिनच कधीतरी... गेल्यावर्षी २१  नोव्हेँबरला 'कसाब'ला फाशीची शिक्षा झाल्यामुळे निश्चितच ओँबळे यांच्या आत्म्याला वाटले असेल कि त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.. आणि या घटनेत मृत पावलेल्या सर्वाँच्या आत्म्याला शांती व त्यांच्या आप्त परिवाराला थोडासा दिलासा अवश्य मिळाला असेल..

शहीद आईपीएस अधिकारी  कामटे  यांच्यावर आधारित IBNLive व  CNN IBN ची डॉक्यूमेंट्री पहा 'सलाम मुंबई '

अठराव्या प्रकरणात अशोक कामटे यांचे जीवलग मित्र कॉनराड लिओ यांनी अशोकजीँच्या वीरमरणानंतर त्यांच्या मुलांना (राहूल व अर्जून) लिहिलेलं भावस्पर्शी पत्र दिलेला आहे.. आणि शेवटच्या एकोणिसाव्या प्रकरणात लेखिका सौ. विनिता अशोक कामटे यांनी लिहून ठेवलंय कि इतक्या साऱ्या दु:खद घटनांनंतर आता 'नवा दिवस-नवं स्वप्न' कसा रंगवायचाय.. सरतेशेवटी शहीद IPS अशोक एम. कामटेँचा जीवनपट दर्शवलाय व सोबतच त्यांचे काही रंगीत छायाचित्रदेखील... मी जाणतो "टु द लास्ट बुलेट"चं समिक्षण जरा जास्तच लांबलंय.. आणि आता आपणास कदाचित वाटत असेल की मी या "अमेय प्रकाशनाद्वारे" प्रकाशित पुस्तकाला रेटीँग देईन पण नाही.. मी कोणी खुप मोठा समिक्षक नसल्याने तसं करणार नाही.. आणि २६ /११ वरील या पुस्तकाला रेटीँग देण्याइतपत मी स्वत:ला पात्रही समजत नाही.. कारण "टु द लास्ट बुलेट" हे फक्त पुस्तक नसून भारतातील प्रशासकीय यंत्रणा, तिची कार्यवाही.. २६ /११ ची ती भयानक घटना.. ती हाताळण्यात झालेल्या चुका व सजगता.. सत्यता.. इतिहास.. आणि एका कर्तव्यदक्ष पोलिस (शिपायापासून तर अधिकाऱ्यापर्यँत) यांच्या वैयक्तिक, पारिवारीक, सामाजिक आणि प्रशासकीय कारकीर्दीची प्रेरणादायी अमरकहाणी आहे... जी आज २६/११/२०१६ रोजी २६ /११ च्या घटनेला आठ वर्षे होत असताना मी जर काही करु शकत असेन तर फक्त त्यांना नतमस्तक होऊन सन्मानपुर्वक फक्त SALUTE/सलाम ठोकू शकतो..
आणि सरतेशेवटी २६ /११ वर आधारीत माझ्या स्वरचित दोन मराठी कविता देतो-

२६/११ ची  कहाणी 

या भारत देशामधलीऽऽऽ
या भारत देशामधली,
आतंकाची वाणी
आतंकवादी होते सगळे,
सगळे पाकिस्तानी॥धृ.॥


ताज उडवला, आम्हा समजली,
आतंकाची भाषा
आम्हा कळली, यांना समजते,
फक्त आतंकाची भाषा
मुंबईमध्ये वाहू लागला,
लोट फक्त रक्तानी ॥1॥


या हल्ल्याची, तारिख होती
२६ अकरा
२६ अकरा ला झाला,
फक्त शस्त्रांचा मारा
देशासाठी जीव ओतीला,
अमुच्या शहिदांनी॥2॥


साऱ्या जगाने निषेध केला,
आतंकवादी हल्ल्याचा
हल्ल्यामध्ये वापर झाला,
गोळीबार आणि ग्रेनेडचा
आणि एकदा पुन्हा हादरली,
मुंबई बाँबस्फोटांनी॥3॥


का जवानांनी मिटले डोळे,
आतंकाशी लढताना?
शेवटी मी श्रद्धांजली देतो,
अमुच्या शहीदांना
२००८  मध्ये अजरामर झाली,
२६ अकराची कहाणी॥4॥

कवी- © राजेश डी. हजारे (RDH)


२६ नोव्हेँबर २००८

'२६ नोव्हेँबर २००८ .'
मुंबईनं केला होता
नेहमीसारखा थाट;
काळ बघत होता
काळ्या रात्रीची वाट;
मुंबईकरांनी संघर्ष केला
एकूण घंटे साठ;

प्रथम निषाण बनली
'सीएसटी' वरची कार;
आणि नंतर सुरू झाला
सलग गोळीबार;

मुंबईनं केला होता
नेहमीसारखा साज;
आतंकाचा निषाण बनला
प्रसिद्ध 'होटल ताज';

हल्ल्यामध्ये शहीद झाले
एकूण वीसच्या वर;
हेमंत करकरे, अशोक कामटे,
संदीप उन्नीकृष्णन व विजय सालस्कर;

हल्ल्यामध्ये जीव गमावला
जवळपास दोनशे नागरीकांनी;
आणि सर्व आतंकवादी होते
फक्त पाकिस्तानी;

शहिदांनी दिली देशासाठी
प्राणांची आहूती;
आणि मिळवली पुन्हा एकदा
शौर्याची पावती;

'ताज होटल', 'नरीमन हाऊस'
आणि 'होटल ओबेराय'; 
साऱ्या जगाने निषेध केला
'आतंकवाद-हाय! हाय!'

आज आतंकवाद मिटवण्याची
अखेर वेळ आली.
मुंबई बाँबस्फोटातील
शहीदांना 'आरडीएच' ची
भावपुर्ण श्रद्धांजली...!

कवी- © राजेश डी. हजारे (RDH)

जय हिंद..!



BaDf3hyIEAANWcd.jpg
  • पुस्तक- TO THE LAST BULLET (टु द लास्ट बुलेट)
  • लेखिका- विनिता कामटे
  • सहलेखिका- विनिता देशमुख
  • मराठी अनुवाद- भगवान दातार
  • पाने- २३१ 
  • मुल्य- १९२ रुपये
  • प्रकाशन- अमेय प्रकाशन, पुणे
  • समीक्षक: राजेश डी. हजारे (आरडीएच) (भ्र. क्र.: ०७५८८८८७४०१)




UPDATE (26/11/2016):

  • ही पुस्तक समीक्षा सर्वप्रथम २७ नोव्हेंबर २०१३ रोजी माझ्या जुन्या अनुदिनीवर प्रकाशित करण्यात आलेली असून या नव्या अनुदिनीवर काळ व अधिकाऱ्यांची पदे  न बदलता अद्ययावत करून २६ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद वीरपुत्रांच्या ८व्या स्मृतीप्रित्यर्थ पुनःप्रकाशित करण्यात आलेली आहे. ही पुस्तक समीक्षा गुडरीड्स डॉट कॉम वर वाचा
  • (समिक्षक 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' गोँदिया जिल्हा शाखेचे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)

5 comments:

  1. Dear RDH Nice analysis. I have also gone tru the book. A wonderful true story. Must be read by all. Thanks.

    ReplyDelete
  2. very nice

    ReplyDelete
  3. @RDHSir I am deeply touched by your review of `To the last bullet.' thank you so much

    ReplyDelete
  4. Superb booklysis... Both the poems are nice and read worthy... Keep going sir...

    ReplyDelete
  5. Nice, Your review of this book gives a view of 26/11incident.Best of luck to do booklysis.

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com