Sunday 30 December 2012

'ते' 13 दिवस- 16 ते 29 डिसेँबर 2012

सन 2012... या वर्षाच्या प्रारंभी अशी एक अफवाच जणू पसरली होती कि... सन 2012 या वर्षाच्या अंतासोबतच; अहो कशाला अंतापूर्वीच 21 डिसेँबर 2012 रोजीच संपूर्ण जगाचा विनाश होईल... जाणीव तर होतीच कि हि निव्वळ अफवा आहे... नंतर जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक व खगोलशास्त्रज्ञांनीदेखील ही अफवा फेटाळली... आणि झालेही तसेच... (21 डिसेँबर) 2012 या वर्षात युगाचा तर अंत झाला नाही... मात्र या दुर्दैवी व दु:खदायी वर्षात माणुसकीचा अवश्य अंत झाला... आणि आता जाता-जाता हा वर्ष संपुर्ण देशाला शोककळेत डुबवून जातोय... आणि भारतीय जनतेला जागवूनदेखील..!

16 डिसेँबर 2012... दिल्ली या देशाची राजधानी असलेल्या शहरात धावत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर पाशवी रितीने सामुहिक बलात्कार करून 6 नराधमांनी मानवतेला काळीमा फासणारे अमानुष कृत्य केले... आणि ही बातमी वा-यासारखी पसरताच अवघा देश रस्त्यावर आला... तरूण-तरूणी, प्रौढ, वयस्क, स्त्री-पुरूष, सर्व... सर्व... आणि अगदी सर्वच...! संपूर्ण देशात या घटनेविरूद्ध एकच जनक्षोभ उसळला... 'We Want Justice..!' 'Hang The Rapist'... निश्चितच याचे श्रेय मिडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांना द्यावेच लागेल म्हणा...! अन्यथा कदाचित हे शक्य झाले नसते... पण का? एका बलात्काराच्या घटनेविरूद्ध अवघा देश का म्हणून रस्त्यावर यावा? काय यापुर्वी बलात्काराच्या घटना घडल्या नव्हत्या? काय ती तरूणी त्यांची कुणी नातेवाईक होती? तर नाही... तरी आला... याचे कारण एकच... त्या 6 नराधमांनी केलेला 'तो' अत्याचार हा फक्त त्या एका तरूणीवर झालेला नव्हता... तर संपूर्ण भारताच्या स्त्रीशक्तीवर झालेला तो अमानवी बलात्कार होता...


आज बहुतेक सामान्य जनता सर्वाधिक पब्लिक ट्रांसपोर्टच्या बसेसवर प्रवास करते... कारण सुरक्षित प्रवासाची मनात खात्रीही असते व ट्रांसपोर्ट हमीही देते... आणि हाच प्रवास एका तरूणीच्या आत्मसन्मानास व 13 दिवस मृत्यूलाही परतवून लावल्यानंतर जीवास बेतावा यापेक्षा मोठे दु:ख काय असणार! त्या बसवर कुणीही असू शकत होतं; ही अमानवी घटना अगदी कुणासोबतदेखील घडू शकत होती; तिथे कूणीही असू शकत होतं... माझी-तुमची-आमची अगदी कुणाचीही मुलगी, बहीण, पत्नी, आई... आणि 'ती' देखील कुणाची ना कुणाची नात, मुलगी, बहीण होतीच... आणि म्हणूनच हा दु:ख तीचा एकटीचा न राहता आपण सर्वाँचा झाला व हा जनक्षोभ स्वाभाविकच होता व आहे... किँबहूना ही जाग आम्हा-तुम्हा व संपूर्ण देशाला थोडी पूर्वी आली असती तर कदाचित आज 'ती' ('दामिनी' म्हणा वा 'निर्भया' काय बिघडतंय?) चा बळी गेला नसता..! उशीरा का होईना... "मला अजून जगायचंय..." अशी जिद्दच घेऊन 13 दिवस मृत्यूलाही अगदी आपल्या लक्षाच्या अवतीभवती गटांगळ्या घालून परतवून लावण्यास यशस्वी ठरल्यानंतर अखेर धैर्यवान 'भारत कि बेटी' 'दामिनी' वा 'निर्भया' (काल्पनिक नाव) ने 29 डिसेँबर 2012 रोजी काळ्या शनिवारी 'सिँगापूरच्या माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात' सुर्योदयाच्याही ब-याच पूर्वी अखेरचा श्वास घेतला... 'दामिनी/निर्भया' गेली... पण 'ती' गेली नाहीच... 'ती'ने स्वत:चा बलिदान देऊन अवघ्या भारत देशाला जागवले...
देश तर जागला... हो काही प्रमाणात सरकारही जागली असणार...! पण शंकाच वाटते... काय या घटनेनंतर व 'निर्भयाचा'च्या बलिदानानंतर तरी खरंच देशाची सरकार जागली? मला असं मुळीच म्हणायचं नाही कि सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही... पण काय सरकारची बस् एवढीच जबाबदारी होती? त्या आंदोलनकर्त्यांसमक्ष येऊन किमान राजकारण्यांच्या राजकीय स्टाईल आश्वासनानेच सही... पण आंदोलकांचे विचार, मते व मागण्या जाणण्यासाठी तर सोडा पण किमान ऐकण्यासाठी तरी येण्याचे कूण्याही राजकारण्याने आवश्यक समजू नये हे विस्मयकारक वाटते... आणि देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान महामहीम राष्ट्रपतीँना भेटण्यासाठी शांततामय मार्गाने राष्ट्रपती भवनात जाण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांनाही थांबवण्यात यावे... शिवाय शांततामय रितीने प्रदर्शन करणा-यांवर अश्रूधुर व थंडीने गारठलेल्या दिवसात थंडगार पाण्याचा वर्षाव करणे... हीच काय सरकारची जबाबदारी? जगातील सर्वात मोठा लोकशाहीसत्ताक देश म्हणून मिरवून घेणा-या भारताच्या जनतेला देशाच्या सरकारला जाब विचारण्याचा व सरकारपुढे आपल्या मागण्या मांडण्यासाठी शांततामय मार्गाने अहिँसक आंदोलन करण्याचाही अधिकार नसावा यापेक्षा दुर्दैवी बाब देशासाठी कोणती असावी?

एकीकडे आम्ही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतो, परंतु आज महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या राजकीय नेत्यांशी भारताच्या राजकीय नेत्यांची तुलना करून फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या लक्षात येईल कि जागतिक महासत्ता बनण्यासाठी जागतिक महासत्ता असलेल्या देशाचे राजकारणी नेते कसे असावे लागतात... आणि यासाठी मला अलीकडेच अमेरिकेत घडलेल्या एका प्रकरणावर प्रकर्षाने कटाक्ष टाकावासा वाटतो... आशा वाटते की जर हा लेख किँवा ही घटनेवर कुण्या भारतीय नेत्याचे लक्ष गेल्यास अमेरिकेच्या राजकारण्यांकडून काहीतरी शिकून घेण्याचा प्रयत्न करतील...

अलीकडेच अमेरीकेत काही गुंडांनी एका शाळेतील विद्यार्थ्याँवर गोळ्या झाडल्या... त्यात ब-याच निष्पाप मुलांचा जीव गेला... या घटनेनंतर थेट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भाषण दिलं... ते निव्वळ आश्वासन देणारं नव्हे तर संतप्त देशाला धीर देणारं भाषण होतं... त्यावेळी भाषण देणारे ओबामा एक राजकारणी नेते नव्हे तर 2 मुलीँचे 'बाप' होते... आणि भारतात जेव्हा इतकी मोठी मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी घटना घडली तेव्हा भारतीय नेत्यांच्या भाषणात केवळ "गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल." हे आश्वासन व "संतप्त देशवासीयांनी संयम व शांतता बाळगावी." हे आवाहन झळकत होतं... देशाच्या 3 उच्चपदस्थ मा. मंत्रीमहोदयांनी भाषणात स्वत: 3 मुलीँचे 'पिता' असल्याचे सांगीतले खरे, पण सन्माननीय मंत्रीमहोदय यांनी आपल्या मुली सार्वजनिक बसमध्ये वर्षातून कितीवेळा प्रवास करतात हेही सांगून द्यायला हवे होते... त्यातही देशाच्या महामहीम राष्ट्रपतीँच्या संदेशास बरेच दिवस लागले... यापूर्वी अमेरीकेच्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निकालानंतर मी माझ्या मागील एका लेख/ब्लॉगमध्ये फरक-भारत व अमेरीकेच्या राजकारणातला...! व्यक्त केला होता तो या घटनेनंतर परत जाणवला... ओबामांच्या भाषणानंतर अमेरीकन जनता निश्चितच थोडीशी निश्चिँत झाली असणार परंतु भारतीय नेत्यांच्या आश्वासनानंतर असं होणं जरा संभ्रमीच वाटतं... त्याला कारणही तसंच आहे... ही सरकारची नेहमीचीच कला आहे जनतेची मनसमजावणी करण्याची... पण बस्! आता पुरे... अजून नव्हे..! आता भारतीय जनता जागून शहाणी झालीय... आम्हाला आता फक्त 'आश्वासनं' नकोत 'अॅक्टिव्हिटी'  हवीय...

आता मला या जनक्षोभात व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होणा-या प्रत्येक देशवासीयांना काही सांगावं व विचारावसं वाटतं... आपली मागणी योग्यच आहे... "जोपर्यँत कठोर कायदा बनत नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणार नाहीत." होय हे अगदी खरंय... आणि "बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी तर सर्वात मोठी फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही." कारण "जेव्हा कोणत्याही वयाच्या स्त्रीजातीवर बलात्कार होतो तेव्हा स्वत:चा तीळमात्र अपराध नसतानादेखील लोकलज्जेला घाबरून एकतर ती आत्महत्या करते, आणि जर का तीने धीर धरून जगण्याचा प्रयत्न केलाच तर समाज तीला जगू देत नाही; परिहार्याने ती जरी श्वास घेत असली तरी मात्र ती आतून क्षणेक्षणी फक्त मरत असते." मग "निरपराध महिलेला मरणास/मरणयातना सोशण्यास भाग पाडणा-या अपराधी नराधमांना ताठ मानेने जगण्याचा काय अधिकार उरतो?"
पण काय बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद संविधानात झाल्यास असे गुन्हे थांबतील? आज हत्येच्या गुन्ह्यासाठी संविधानात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 मध्ये फाशीची तरतूद आहे... पण किती गुन्हेगारांना फाशी होते? आणि फाशी झालीही तर अंमलबजावणीस किती विलंब लागतो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाशीची शिक्षा असल्यामुळे काय हत्या होणे थांबलेत? नाही ना..? तरी बलात्काराचा गुन्हा अजामीनपात्र व्हावा... खटला जलदगती (Fasttrack) न्यायालयात चालावा आणि कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा (अर्थात फाशीच) असावी या मागण्या अयोग्य नाहीतच... कारण फाशीची मागणी केल्यास फाशी नाही तर किमान फाशीपूर्वीच्या सर्वात कठोर शिक्षेचा (जन्मठेपच/नपुंसकत्व) कायदा येईल पण ही मागणी केल्यास परत कमी शिक्षा न होवो...!

एकीकडे बलात्काराच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यँत (उलट नाही) आंदोलन व 'निर्भया/दामिनी' साठी प्रार्थना होत असताना काय हे गुन्हे थांबलेत? उलट या 13 दिवसात बरेच बलात्कार व विनयभंगाच्या घटना समोर आल्या... म्हणून फक्त कठोर कायदा येऊन भागणार नाही... आवश्यकता आहे- सतर्कता बाळगण्याची, हिँमत एकवटण्याची, 'निर्भय' बनण्याची आणि मुख्यत: महिलांनी संरक्षणार्थ प्रत्युत्तर देऊन प्रतीकार करण्याची... एकीकडे आम्ही स्त्री-पुरूष समानतेचे धडे देतो आणि दुसरीकडे या 21 व्या शतकाच्या 12व्या वर्षाचा अंत होत असतानादेखील पुरूषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली कुटूंबापासून तर समाजापर्यँत प्रत्येकच क्षेत्रात स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो... जोपर्यँत हा स्त्री व पुरूषांमधील वैचारीक भेद आणि पुरूषप्रधान संस्कृतीचा अर्थहिन प्रकार संपुष्टात येऊन स्त्रीयांना ख-या अर्थाने पुरूषांसम वागणुक व दर्जा मिळणार नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणे मला तरी जिकिरीचेच वाटते...

सरतेशेवटी इतकीच आशा व्यक्त करुयात कि ब-याच वर्षाँनंतर का होईना आता बलात्कारासारख्या गुन्ह्यांबद्दलचा उद्रेक पेटून तरूणाईच्या मनात उफाळलेला जनक्षोभ व जनतेला आलेली जाग लवकर शमणार नाही व सरकारही असे गुन्हे थांबण्यासाठी कठोर कायदा आणूनच राहील... आणि वर्ष 2012 च्या दु:खद अंतास दिल्ली गैँगरेप (सामुहिक बलात्कार) पीडित निरपराध व निष्पाप तरूणी 'दामिनी/निर्भया'ने दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये याकरिता अपराधी नराधमांना कठोरात कठोर (फाशीची) शिक्षा देऊन आगामी 2013 या नववर्षात अशी दु:खद घटनेस परत एखादी दामिनी बळी पडू नये याकरिता, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार लवकरात लवकर ठोस निर्णय घेत कायद्यात सुधारणा करेल... व हिच नववर्षाच्या स्वागतोक्षणी 'दामिनी/निर्भया'च्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तीला संपूर्ण देशातर्फे वाहिलेली ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल...

© राजेश डी. हजारे (RDH)
(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)

© सर्वाधिकार सुरक्षित |  राजेश डी. हजारे | लेखकाच्या परवानगीशिवाय सदर लेख जसाचा तसा किंवा आंशिक स्वरुपात प्रसिद्ध करण्यास  मनाई आहे. मूळ लेखकाच्या सहमतिने प्रसारित केल्यास सदर पोस्ट चा दुआ (link) देणे तसेच लेखकाचे नाव उल्लेखित करणे बंधनकारक राहील. सदर लेख लेखकाच्या परवानगीशिवाय प्रसारित झाल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 

1 comment:

  1. Chandrakant Bhoslw5 September 2016 at 14:50

    .... तर या साठी व्यापक जनआंदोलनाची गरज आहे... तसेच सर्वच बलात्काराच्या गुन्ह्यांकडे सारख्याच नजरेने पाहायला हवे.. चित्रपटातील भुतांप्रमाणे मेणबत्ती घेवून गरका मारणाऱ्या आंदोलनाने मात्र काहीच शक्य होणार नाही... तर राजेश हजारे सर मस्त पत्र...

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com