Friday 14 April 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अल्पपरिचय व जीवनदर्शन व कार्य

अल्प परिचय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्त्रोत: WikiPedia.org)

  • नाव: भीमराव रामजी आंबेडकर
  • जन्म: 14 एप्रिल 1891
  • जन्मस्थळ: महु (मध्यप्रदेश)
  • मुळ गाव: मु. आंबवडे ता. मंडणगढ जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)
  • परिवर्तीत नाव: बाबासाहेब आंबेडकर
  • मुळ धर्म: हिंदू
  • परिवर्तीत धर्म: बौद्ध
  • मुळ आडनाव: सपकाळ, आंबवडेकर
  • परिवर्तीत आडनाव: आंबेडकर
  • आईचे नाव: भीमाबाई/भीमाई
  • घरी प्रचलित नाव: भीवा
  • जात: महार
  • पहिले गुरू: भगवान गौतम बुद्ध 
  • दुसरे गुरू: संत कबीर 
  • तिसरे गुरू: महात्मा जोतिबा फुले 


जीवनदर्शन

  • 14 एप्रिल 1891: महू (मध्यप्रदेश) येथे जन्म
  • 1908: वयाच्या 17 व्या वर्षी 9 वर्षाँच्या रमाबाई (रमाई) शी विवाह 
  • 1912: 'Elfinston College Mumbai' येथून B.A. ची पदवी परिक्षा उत्तीर्ण
  • 1915: M.A. झाल्यावर 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर Ph.D. संपादन
  • 31 जानेवारी 1920: 'मुकनायक' नावाचे पाक्षिक सुरू
  • जून 1921: M.Sc. ची पदवी परिक्षा उत्तीर्ण
  • 1922: बॅरीस्टरची पदवी 
  • 1923: 'Doctor of Science' (D.Sc.) ची पदवी प्रदान
  • 20 जुलै 1924: 'बहिष्कृत हितकारीणी सभेची' स्थापना
  • 20 मार्च 1927: महाडचे 'चवदार तळे' अस्पृश्यांना खुले करण्यासाठी सत्याग्रह
  • 03 एप्रिल 1927: 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरू
  • 29 जून 1928: 'समता' हे पाक्षिक सुरू
  • 24 नोव्हेँबर 1930: 'जनता' हे पाक्षिक सुरू
  • 27 मे 1935: पत्नी रमाबाई चे निधन
  • 13 ऑक्टोबर 1935: येवला (जि. नाशिक) येथे धर्माँतराची घोषणा
  • 16 मार्च 1937: चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या अस्पृश्यांच्या हक्कावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब
  • 20 जून 1946: 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना व मुंबई येथे 'सिद्धार्थ महाविद्यालय' स्थापन
  • 15 एप्रिल 1948: डॉ. शारदा (सविता) कबीर यांच्याशी पुनर्विवाह 
  • 25 मे 1950: कोलंबोला बौद्ध धर्माच्या अवलोकनासाठी प्रयाण
  • जून 1950: औरंगाबाद येथे P.E.S. College सुरू
  • 05 जून 1952: कोलंबिया विद्यापीठातर्फे 'Doctor of Law' ही पदवी प्रदान 
  • डिसेँबर 1954: रंगुनला तिस-या जागतिक बौद्ध परिषदेसाठी प्रयाण
  • 1955: P.E.S. College चे 'मिलिँद महाविद्यालय' असे नामांतर
  • मे 1955: 'भारतीय बौद्धजण समिती'ची स्थापना. दीक्षा घेतल्यानंतर याचे नामांतर 'भारतीय बौद्ध महासभा' असे करण्यात आले.
  • 04 फेब्रूवारी 1956: 'प्रबुद्ध भारत' सुरू
  • 14 ऑक्टोबर 1956: महास्थानावर चंद्रमणी यांच्याकडून नागपूर येथील दीक्षाभूमी वर हिँदू धर्म त्यागून हजारो अनुयायांच्या सोबतीने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 
  • 15 नोव्हेँबर 1956: काठमांडू (नेपाळ) येथे चौथ्या बौद्ध परिषदेला हजर
  • 06 डिसेँबर 1956: डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान, थोर तत्त्ववेत्त्याचे आजाराने पहाटे झोपेत दिल्ली येथे महापरिनिर्वाण
  • 14 एप्रिल 1990: 99 व्या जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (मरणोत्तर) प्रदान


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक कार्याची सुरुवात इ.स.1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेची स्थापना करुन केली.
डॉ. आंबेडकरांनी 'अस्पृश्य' हेही भारताचेच नागरीक आहेत व इतर कोणाही नागरीकाइतकाच त्यांचाही अधिकार आहे अशी भीमगर्जना केली. अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रश्नाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले.

अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी भरण्यास मज्जाव असणा-या महाडच्या चवदार तळ्याचे पाणी डॉ. आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडला सत्याग्रह करून अस्पृश्यांसाठी दालन खुले केले. 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करता यावा म्हणून हिँदू मंदिरांचे दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले केले. अस्पृश्यता व स्त्रीदास्य यांचा पुरस्कार करणारी मनुस्मृती डॉ. आंबेडकरांनी दहन केली.
डॉ. आंबेडकरांनी दीनदुबळ्या, अस्पृश्य समाजाच्या जुलमाने त्रस्त झालेल्या, अडाणी समाजाच्या कार्याचा बोझा स्वत:च्या शीरावर घेतला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ.स. 1930 ते 1932 दरम्यान इंग्लंडमधील 3 गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. अस्पृश्यांसाठी राखीव जागा मान्य करणारा 'पुणे करार' त्यांनी महात्मा गांधीजींबरोबर केला. इ.स.1937 मध्ये डॉ. आंबेडकरांनी 'स्वतंत्र मजुर पक्षाची' स्थापना केली तसेच 1942 साली 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' या पक्षाची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित मुक्ती संग्रामातून दलितांच्या दु:खाला वाचा फोडली. त्यांची अस्मिता जागृत केली. त्यांना सामाजिक व राजकीय समता व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नव्या सुधारणा व उन्नतीचा मार्ग दाखवून दिला. दलित समाजास सन्मान, स्वाभीमान व तत्त्वप्रणालीँची पक्की बैठक दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी 'मुकनायक' नावाचे पाक्षिक सुरू केले. मे 1920 मध्ये नागपूर येथे बहिष्कृत समाजाची परिषद घेतली. 19-20 मार्च 1927 रोजी महाडचे 'चवदार तळे' अस्पृश्यांना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा म्हटलेही होते कि "मी माझ्या समाजाची प्रगती करण्यास अपयशी ठरलो तर स्वत:ला बंदुकिच्या गोळीने ठार करेन." आणि त्यांनी समाजातील जनतेला गुरुमंत्र दिला कि " आपल्या मिळकतीचा 20 वा भाग समाजोन्नतीच्या कामी लावा."


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धार्मिक कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हिँदू घराण्यात झाला होता परंतु त्यांनी प्रतिज्ञा केली होती कि "मी हिँदू म्हणून जन्मलो असलो तरी हिँदू म्हणून मरणार नाही." त्यांचं असं मत होतं कि "माणूस धर्माकरिता नसून धर्म माणसाकरिता आहे." अखेर त्यांनी सर्व धर्माँचा सखोल अभ्यास करून बौद्ध धर्माचे तत्त्व व श्रेष्ठत्व पटल्यानंतर ज्या भगवान गौतम बुद्धांनी पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खूले केले त्या समतेवर उभारलेल्या बौद्ध धर्माची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी वर आपल्या अनुयायांसह दिक्षा घेतली.
प्रतिमा स्त्रोत: लॉर्ड बुद्धा टीव्ही

25 मे 1950 रोजीच त्यांनी कोलंबो (श्रीलंका) येथे बौद्ध धर्माच्या अवलोकनासाठी प्रयाण केले होते तसेच त्यांनी डिसेँबर 1954 रोजी तिस-या जागतिक बौद्ध परिषदेसाठी प्रयाण केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मे 1955 मध्ये 'भारतीय बौद्ध समितीची' स्थापना करून दीक्षा घेतल्यानंतर याचेच नाव 'भारतीय बौद्ध महासभा' असे करण्यात आले. 04 फेब्रुवारी 1956 रोजी 'प्रबुद्ध भारत' सुरु केले व 15 नोव्हेँबर 1956 रोजी काठमांडू (नेपाळ) येथे 4थ्या बौद्ध परिषदेलाही हजर राहिले. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी अचलपूर (जि. अमरावती) येथील दत्त मंदिर, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अमरावतीचे अंबामाता मंदिर खुले केले.
दिक्षाभूमी (प्रतिमा स्त्रोत: WikiMedia.org)

नागपुरातील दीक्षाभूमीवर 15 ऑक्टोबर 1956 रोजी धर्माँतर करून बौद्ध धर्माचा स्विकार करतानाच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात कि "मी बौद्धांना हक्क व सवलती मिळवून देईनच!" जे त्यांनी केले. त्यांनी भाषणात असंही नमूद केलं होतं कि "मी एक दिवस संपूर्ण भारताला बौद्धमय करून दाखवीन" व तसं पाहिलं तर योगायोगाने हे आढळून येईल कारण स्वतंत्र भारत देशाचे राष्ट्रीय ध्वज 'तिरंगा' च्या मध्यभागी असलेलं बौद्ध धर्माचं प्रतिक 'धम्मचक्र' वा सारनाथ येथील 'अशोकचक्र' यांच्यातील साम्यता त्यांच्या वक्तव्याला सत्य ठरवणारं उदाहरण आहे... 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - शैक्षणिक कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खुप शिक्षण घेतले होते व शिक्षणाचे महत्त्व ते जाणत होते कारण त्याकाळी दलितांना शिक्षण घेता येत नसल्याने त्यांचे स्पष्ट मत होते कि "जर दलित समाजाचा विकास करावयाचा असेल तर तो शिक्षणातूनच होऊ शकतो." तसेच "शिक्षण मानवी जीवनात क्रांती घडवून आणते." म्हणून डॉ. आंबेडकरांनी तरुण तसेच प्रौढ दलितांसाठी रात्रशाळा चालवल्या व वाचनालये सुरू केली कारण पुस्तकांशिवाय शिक्षण अपुरे आहे याची जाणीव त्यांना होती व बाबासाहेबांची पुस्तकांशीच मैत्री होती. इ.स. 1946 मध्ये त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' (Peoples Education Society) ही संस्था स्थापन केली ज्या संस्थेने मुंबई येथे 'सिद्धार्थ कॉलेज' व औरंगाबाद येथे 'मिलिँद कॉलेज' स्थापन केले व इतर शैक्षणिक संस्थांबरोबरच दलित विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे निर्माण केली. त्यांना असे वाटे कि स्त्रीयांनाही पुरूषांच्या बरोबरीने व पुरूषांसोबत एकाच शाळेत शिक्षण देण्यात यावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी विचार मांडताना म्हणतात कि "EDUCATION is one of the medicine for treatment of our all social diseases." अर्थात "आपल्या सर्व सामाजिक दुखण्यांवर 'शिक्षण' हेच एकमेव औषध आहे." आणि मला वाटते कि त्या औषधाविषयीच जणू ते सांगत असावेत कि "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याखेरीज राहणार नाही." त्यांचे असे मत होते कि समाजाच्या सर्व थरांपर्यँत शिक्षण गेले पाहीजे तसेच शिक्षणाची व्याख्या करताना ते सांगतात कि "शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणणारे, सामाजिक व गुलामगिरी नष्ट करण्याचे व आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याचे शस्त्र आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठाऊक होते कि "विद्यार्थ्यांच्या सर्वाँगीण विकास व ख-या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे." आणि म्हणून 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या (संविधान) कलम 45(अ) मध्ये बाबासाहेबांनी 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद केली आहे. तसेच समस्त बांधवांना संदेश दिला कि "Learn, Unity and Fight." अर्थात "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्याचे शब्दात वर्णन करणे तसे शक्यच नसले तरी वरील लेखमालेत त्याचा संक्षिप्त आढावा घेतलेला आहे...
प्रतिमा स्त्रोत: PhotoBucket.com

अवघ्या आयुष्यभर समाज व देशासाठी झटणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान, थोर तत्त्ववेत्त्याचे दिल्ली येथे आजाराने 06 डिसेँबर 1956 रोजी झोपेत महापरिनिर्वाण झाले आणि बाबासाहेबांबरोबरच आयुष्यभर जनसेवेत झिजवणा-या एका महान सुयुगाचा अंत झाला...
अंतिमत: भारत सरकारने 14 एप्रिल 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.


आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56 व्या महापरिनिर्वाण दिनी १२६व्या जयंती निमित्त  मी स्वलिखित 'भारतरत्न भीमराव' या कवितेसह सदर सदराचा समारोप करू ईच्छितो...

"रामपुत्र भारतरत्न जन्मला
माता भिमाईच्या पोटी
जन्मच झाला होता भीमाचा
समाज उत्थानासाठी ।।धृ.।।

बालपणी शिक्षण घेऊनी
समाजा शिक्षण दिधले
अस्पृश्य असुनी
चवदार तळ्याचे
पाणीही प्राशन केले
बहुजनांच्या मनी,
अक्षर कोरुनी
भरली कोरी पाटी ।।१।।

जाऊन चरणी बुद्धास शरणी
दिक्षाही घेतली
संविधान लिहिण्या न डगमगता
हिँमत त्यांनीच केली
धीर खचला तर आधार देण्या
रमाई बनली काठी ।।२।।

विसरु नका रे भीमपुत्रांनो
माझ्या भीमरावांना
जेव्हा-जेव्हा येईल संकट
'जयभीम' ची द्या गर्जना
'आर.डी.एच.' संगे चला पुढे या
भीमरायाच्या
विचारप्रचारासाठी" ।।३।।


  • लेखन व संपादन तसेच कवी: राजेश डी. हजारे (आरडीएच)
  • भ्रमणध्वनी क्रमांक: ७५८८८८७४०१
  • विरोप पत्ता: contact@rdhsir.com



UPDATE: सदर लेख 2009-10 च्या अध्यापक शिक्षण पदविका (D.T.Ed.) अभ्यासक्रमाच्या भारतीय समाज आणि प्राथमिक शिक्षण विषयांतर्गत सरावाकरिता दमयंतीताई देशमुख अध्यापक विद्यालय रामटेक येथे राजेश डी. हजारे यांनी छात्राध्यापक म्हणून सादर केलेला असून त्यांच्या अनुदिनीवर सर्वप्रथम 06 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झालेला होता. 14 एप्रिल 2017 रोजी सदर लेख पुनःसंपादित करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.  

2 comments:

  1. thodya velasathi dolyat pani yeun gele.

    ReplyDelete
  2. छान लेख आहे. असेच लिहित रहा आणि समाज कल्याण करीत रहा. हीच शुभेच्छा.

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com