Pages

Monday, 31 December 2012

BlogPost 37: 'ते 13 दिवस' - 16 ते 29 डिसेँबर 2012

टिप: याच लेख/ब्लॉगचा यापुर्वीचा मजकूर (सुरूवातीपासून) वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

अलीकडेच अमेरीकेत काही गुंडांनी एका शाळेतील विद्यार्थ्याँवर गोळ्या झाडल्या... त्यात ब-याच निष्पाप मुलांचा जीव गेला... या घटनेनंतर थेट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भाषण दिलं... ते निव्वळ आश्वासन देणारं नव्हे तर संतप्त देशाला धीर देणारं भाषण होतं... त्यावेळी भाषण देणारे ओबामा एक राजकारणी नेते नव्हे तर 2 मुलीँचे 'बाप' होते... आणि भारतात जेव्हा इतकी मोठी मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी घडली तेव्हा भारतीय नेत्यांच्या भाषणात केवळ "गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल." हे आश्वासन व "संतप्त देशवासीयांनी संयम व शांतता बाळगावी." हे आवाहन झळकत होतं... देशाच्या 3 उच्चपदस्थ मा. मंत्रीमहोदयांनी भाषणात स्वत: 3 मुलीँचे 'पिता' असल्याचे सांगीतले खरे, पण सन्माननीय मंत्रीमहोदय आपल्या मुली सार्वजनिक बसमध्ये वर्षातून कितीवेळा प्रवास करतात हेही सांगून द्यायला हवे होते... त्यातही देशाच्या महामहीम राष्ट्रपतीँच्या संदेशास बरेच दिवस लागले... यापूर्वी अमेरीकेच्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निकालानंतर मी माझ्या मागील एका लेख/ब्लॉगमध्ये फरक-भारत व अमेरीकेच्या राजकारणातला...! व्यक्त केला होता तो या घटनेनंतर परत जाणवला... ओबामांच्या भाषणानंतर अमेरीकन जनता निश्चितच थोडीशी निश्चिँत झाली असणार परंतु भारतीय नेत्यांच्या आश्वासनानंतर असं होणं जरा संभ्रमीच वाटतं... त्याला कारणही तसंच आहे... ही सरकारची नेहमीचीच कला आहे जनतेची मनसमजावणी करण्याची... पण बस्! आता पुरे... अजून नव्हे..! आता भारतीय जनता जागून शहाणी झालीय... आम्हाला आता फक्त 'आश्वासनं' नकोत 'अॅक्टिव्हिटी' हवीय...

आता मला या जनक्षोभात व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होणा-या प्रत्येक देशवासीयांना काही सांगावं व विचारावसं वाटतं... आपली मागणी योग्यच आहे... "जोपर्यँत कठोर कायदा बनत नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणार नाहीत." होय हे अगदी खरंय... आणि "बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी तर सर्वात मोठी फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही." कारण "जेव्हा कोणत्याही वयाच्या स्त्रीजातीवर बलात्कार होतो तेव्हा स्वत:चा तीळमात्र अपराध नसतानादेखील लोकलज्जेला घाबरून एकतर ती आत्महत्या करते, आणि जर का तीने धीर धरून जगण्याचा प्रयत्न केलाच तर समाज तीला जगू देत नाही; परिहार्याने ती जरी श्वास घेत असली तरी मात्र ती आतून क्षणेक्षणी फक्त मरत असते." मग "निरपराध महिलेला मरणास/मरणयातना सोशण्यास भाग पाडणा-या अपराधी नराधमांना ताठ मानेने जगण्याचा काय अधिकार उरतो?"

पण काय बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद संविधानात झाल्यास असे गुन्हे थांबतील? आज हत्येच्या गुन्ह्यासाठी संविधानात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 मध्ये फाशीची तरतूद आहे... पण किती गुन्हेगारांना फाशी होते? आणि फाशी झालीही तर अंमलबजावणीस किती विलंब लागतो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाशीची शिक्षा असल्यामुळे काय हत्या होणे थांबलेत? नाही ना..? तरी बलात्काराचा गुन्हा अजामीनपात्र व्हावा... खटला जलदगती (Fasttrack) न्यायालयात चालावा आणि कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा (अर्थात फाशीच) असावी या मागण्या अयोग्य नाहीतच... कारण फाशीची मागणी केल्यास फाशी नाही तर किमान फाशीपूर्वीच्या सर्वात कठोर शिक्षेचा (जन्मठेपच/नपुंसकत्व) कायदा येईल पण ही मागणी केल्यास परत कमी शिक्षा न होवो...!

एकीकडे बलात्काराच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यँत (उलट नाही) आंदोलन व 'निर्भया/दामिनी' साठी प्रार्थना होत असताना काय हे गुन्हे थांबलेत? उलट या 13 दिवसात बरेच बलात्कार व विनयभंगाच्या घटना समोर आल्या... म्हणून फक्त कठोर कायदा येऊन भागणार नाही... आवश्यकता आहे- सतर्कता बाळगण्याची, हिँमत एकवटण्याची, 'निर्भय' बनण्याची आणि मुख्यत: महिलांनी संरक्षणार्थ प्रत्युत्तर देऊन प्रतीकार करण्याची... एकीकडे आम्ही स्त्री-पुरूष समानतेचे धडे देतो आणि दुसरीकडे या 21 व्या शतकाच्या 12व्या वर्षाचा अंत होत असतानादेखील पुरूषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली कुटूंबापासून तर समाजापर्यँत प्रत्येकच क्षेत्रात स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणूक देतो... जोपर्यँत हा स्त्री व पुरूषांमधील वैचारीक भेद आणि पुरूषप्रधान संस्कृतीचा अर्थहिन प्रकार संपुष्टात येऊन स्त्रीयांना ख-या अर्थाने पुरूषांसम वागणुक व दर्जा मिळणार नाही तोपर्यँत बलात्कारासारखे गुन्हे थांबणे मला तरी जिकिरीचेच वाटते...

सरतेशेवटी इतकीच आशा व्यक्त करुयात कि ब-याच वर्षाँनंतर का होईना आता बलात्कारासारख्या गुन्ह्यांबद्दलचा उद्रेक पेटून तरूणाईच्या मनात उफाळलेला जनक्षोभ व जनतेला आलेली जाग लवकर शमणार नाही व सरकारही असे गुन्हे थांबण्यासाठी कठोर कायदा आणूनच राहील... आणि वर्ष 2012 च्या दु:खद अंतास दिल्ली गैँगरेप (सामुहिक बलात्कार) पीडित निरपराध व निष्पाप तरूणी 'दामिनी/निर्भया'ने दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये याकरिता अपराधी नराधमांना कठोरात कठोर (फाशीची) शिक्षा देऊन आगामी 2013 या नववर्षात अशी दु:खद घटनेस परत एखादी दामिनी बळी पडू नये याकरिता, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार लवकरात लवकर ठोस निर्णय घेत कायद्यात सुधारणा करेल... व हिच नववर्षाच्या स्वागतोक्षणी 'दामिनी/निर्भया'च्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तीला संपूर्ण देशातर्फे वाहिलेली ख-या अर्थाने श्रद्धांजली ठरेल...

-राजेश डी. हजारे (RDH)
(गोँदिया जिल्हाध्यक्ष - अ.भा.मराठी साहित्य परिषद, पुणे)

No comments:

Post a Comment