Saturday 20 August 2016

#BookLysis: स्वच्छंदी - Its all about LIFE... (Pranav Joshi) 3.5/5*

१४२७ वा दिवस
१४६ वी अनुदिनी
२३ वी पुस्तक समिक्षा
द्वितीय (मराठी) पुस्तक समिक्षा
प्रथम काव्यसंग्रह समिक्षा

नमस्कार मित्रहो! १ डिसेंबर २०१४ अर्थात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळानंतर मी मराठीत अनुदिनी (ब्लॉग) लिहितोय. संगणक आल्यानंतर खरच मराठी अनुदिनी लिहिणं खूप कमी झालंय आणि अलीकडे या अनुदिनीवर इंग्रजी समिक्षा सुरु झाल्यानंतर तर मराठी भाषा नाहीसीच झाली होती. पण असो... शेवटी मराठी भाषेचा मी छोटासा सेवक पुन्हा मराठी भाषेकडेच वळलोय. ही अनुदिनी लिहिताना खरंच मातृभाषेत पुनश्च वळल्याचा वेगळाच आनंद होतोय. तर असो... मी आज पुन्हा सवयीप्रमाणे भाषण देणार नाही. (तसंही वर जे काही लिहिलंय हे भाषणाहून कमी आहे का? हाहाहा... :) ! या अनुदिनीच्या जुन्या वाचकांना आठवत असेल की मी तीन वर्षापूर्वी २७ नोव्हेंबर २०१३ रोजी टू द लास्ट बुलेट या मुंबई वर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद ‘आयपीएस’ अधिकारी श्री अशोक कामटे यांच्या जीवनचरित्राची मराठी भाषेत समिक्षा प्रसिद्ध केली होती. त्यानंतरही बरीच मराठी पुस्तके वाचून काढली पण समिक्षा लिहिण्याचा योग आला नाही. गतवर्षी ‘रोजगार नोकरी संदर्भ’ या साप्ताहिकातून परिचय झालेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री नामदेव राठोड यांचे आत्मचरित्र ‘वादळवाट’ वाचून समिक्षा कागदावर लिहून ठेवली, मात्र अद्याप वर्ष उलटून देखील ती समिक्षा येथे प्रसिद्ध न करू शकल्याचा खेद आहे. पण ती समीक्षाही आता लवकरच या अनुदिनीवर प्रसिद्ध करण्याचा माझा प्रयत्न असेल. तर असो... या अनुदिनीच्या प्रारंभी हे सर्व नमूद करण्याचे कारण हेच की आज मी पुन्हा मराठीत एका मराठी पुस्तकाची समिक्षा प्रसिद्ध करत आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ही माझी दुसरी (खरंतर पहिलीच) मराठी समिक्षा आहे कारण यापूर्वीची मराठी समिक्षा केलेले पुस्तक हे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत होते. यापूर्वी मी विविध प्रकारच्या पुस्तकांचे समीक्षण केले पण त्यात कोणतेही काव्यसंग्रह नव्हते. अर्थात ‘स्वच्छंदी’  हे पुस्तक प्रथमच काव्यसंग्रह आहे जे मी समीक्षण करतोय.

थोडक्यात कवी व माझ्या परीचयाविषयी:

प्रणव जोशी हे मराठी साहित्यक्षेत्रात तसं नवीन नाव. खूप कमी वयात त्यांनी मराठी कादंबरी ‘टेक इट ईझी’ प्रकाशित केली. त्यांचे पहिलेच पुस्तक महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक ‘लोकमत’ची पुरवणी ‘ऑक्सिजन’ मध्ये झळकली. खरंतर आमच्या परिचयाचे सर्व श्रेय त्या बातमीलाच जाते. मी त्याच पुस्तकाबद्दल अभिनंदन करण्यासाठी ‘फेसबुक’ वर संपर्क साधला असता केव्हा आम्ही आभासी विश्वातच का असेना पण चांगले मित्र बनलो काही कळलेच नाही. ‘टेक इट ईझी’ च्या सर्व प्रती संपल्यामुळे ‘ती’ पुस्तक मला वाचता आली नाही. परंतु काही दिवसांनीच अगदी सुखद धक्क्याप्रमाणे प्रणव जोशी चा काव्यसंग्रह ‘स्वच्छंदी – Its all about LIFE...’ मला सस्नेह भेट म्हणून कुरियरने प्राप्त झाला. इंग्रजी पुस्तक समीक्षणाच्या व्यस्ततेमुळे हा संग्रह वाचण्यास खरंच मला जरा उशीरच लागला. अन गत महिन्यात तो वाचून पूर्ण केल्यानंतर देखील या समिक्षणाला पुढे ढकलत दोन इंग्रजी पुस्तकांची समीक्षणे प्रसिद्ध केली. प्रणव खरंतर माझ्याहून वयाने लहान आहे व चांगला मित्र आहे त्यामुळे या विलंबाबद्दल मी त्याला क्षमा मागणार नाही मात्र त्याने अधिक विलंब करत असल्याची जाणीव असून देखील पुरेसा वेळ घेण्याची मोकळीक दिली याबद्दल त्याचे धन्यवाद जरूर मानेन. आनंदाची बातमी म्हणजे नुकतीच त्याची तिसरी पुस्तक ‘फॉल्टलाईन’ ही मराठी कादंबरी ई-पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालीय. ‘फॉल्टलाईन’ साठी चला आपण सर्व मिळून लेखकाला शुभेच्छा देऊया, अन मी पण आता थेट ‘स्वच्छंदी’च्या समिक्षणाला सुरुवात करतोय.

स्वच्छंदी – Its all about LIFE... ची सविस्तर समिक्षा

पुस्तकाचे बाह्यरंग:

मुखपृष्ठ: स्वच्छंदी’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचा पृष्ठभाग निळ्या रंगाचा आहे. मुखपृष्ठाचा निळा रंग आकाशाचे प्रतिनिधीत्व करतो. खाली जमिनीवर दगड, जीर्ण गवत, एक दोन हिरवी झाडे दिसतात. अशा समतोल वातावरणात मुखपृष्ठाच्या मध्यभागी दोन्ही हात हवेत पसरून उंच उडी घेतलेल्या युवकाला पाहून असे वाटते की जणू कवी स्वतः सर्व भूतकाळ, भविष्यकाळ विसरून वर्तमान जीवनाचा आनंद घेत मुक्त छंदात अर्थात स्वतःच्या एका अनोख्या छंदात वा जणू अनोख्या विश्वात रममाण झालाय. पुस्तकाचे शिर्षक ‘स्वच्छंदी’ हे कवीच्या काव्यप्रेम व छंद म्हणून लिहिलेल्या कवितांची ओळख करून देते व इंग्रजी उपशिर्षक ‘Its all about LIFE...‘ हे ‘स्वच्छंदी’ हा काव्यसंग्रह व त्यातील कविता कशा जीवनावर व आयुष्यातील विविध पैलू व वळणांवर भाष्य करणाऱ्या आहेत याची जाणीव करून देतात.

मलपृष्ठ: ‘स्वच्छंदी’चे मलपृष्ठ हे मुखपृष्ठाशी अगदी तंतोतंत साधर्म्य साधणारे आहे. मलपृष्ठावर ‘शब्दांजली प्रकाशन’चे ओळखचिन्ह (लोगो)‘स्वच्छंदी’ हे कवितेचे शिर्षक नसले तरी शिर्षक-कविता म्हणता येईल अशी ‘वेडा-शहाणा’ ही कविता उद्धृत केलेली आहे.

“घोळक्यात एकटाच राहतो,
वाकड्या वाटेने सरळ जातो,
न शिकविता शहाणा होतो,
अज्ञानी मी नवयुगाचा...
पुढे माया, सोबत काया,
मागे सोडली मी स्व-दया,
ह्या सर्वांची जाणीव नाही ज्या,
असा अत्मावंचक अयशस्वी मी...
रोज यश समोर पहातो,
त्या मागे धावत सुटतो,
मार्ग परीही न उमगतो,
वाट मजला ही सापडेना...
जिद्द, चिकाटी, ध्यास नाही,
ध्येयाची जणू आसच नाही,
चंचलत्व सदैव मन वाही,
न सावरता, स्वच्छंदी स्वप्नं पहातो...”

बांधणी, पृष्ठसंख्या व किंमत: ‘स्वच्छंदी’  या काव्यसंग्रहात मुखपृष्ठ व मलपृष्ठ वगळता एकूण १०१ पृष्ठे असून ती पृष्ठावरणबद्ध (paperback) पुस्तक स्वरूपात बांधणी केलेली आहेत. सदर काव्यसंग्रहाची छापील कमाल किंमत ही ११० रुपये आहे जी एक वाचक व समीक्षक म्हणून पृष्ठसंख्या व मूळतः पुस्तकाचा काव्यरस लक्षात घेता व ISBN नोंदणीचा अभाव लक्षात घेता अधिक वाटते.

पुस्तकाचे अंतरंग:

भाषा व मांडणी: कवी प्रणव जोशी यांनी ‘स्वच्छंदी’ या काव्यसंग्रहात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषेतील कवितांचा समावेश केला आहे. काव्यसंग्रहात एकूण ७५ कवीता व ७५ शेर ५ भागांमध्ये मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवितेला एक पार्श्वभूमी असते, ती कवीने प्रत्येक कवितेपुर्वी प्रस्तावना स्वरूपात व्यक्त केली आहे. थोडक्यात ‘स्वच्छंदी’ मधील कवितांची काव्यमैफील कवीने छान प्रकारे सजवलेली आहे.

काव्यसमिक्षा: ‘स्वच्छंदी’ या काव्यसंग्रहातील पहिली कविता ‘देव’ ही देवाच्या अस्तित्वावरच भाष्य करते. ‘मत्स्य’ या कवितेत ‘मासा’ चा कार्यक्रम बघताना कवीच्या मनात आलेले विचार व्यक्त केलेत. या कवितेत ‘मासा’ ची जिद्द वाचकाला प्रेरणा देते. ‘सूर्योदय’ व ‘सूर्योदय-२’ या दोन कवितांमध्ये सारखेच विचार कवीने चपखलपणे भविष्यकाळ व भूतकाळ या दोन भिन्न काळात व्यक्त केलेले आहेत. मलपृष्ठाविषयी लिहित असताना वर उल्लेख केल्याप्रमाने ‘वेडा-शहाणा’ या कवितेला ‘स्वच्छंदी’ हे शिर्षक नसूनही ‘स्वच्छंदी’ या काव्यसंग्रहाची शिर्षक कविता म्हणता येईल. पृष्ठ क्र. १३-१४ वरील निनावी कवितेत प्रियकराने प्रेयसीशी साधलेला संवाद मनाला अलगद स्पर्श करून जातो. मला पृष्ठ क्र. १४ वरील एक शेर उद्धृत करावासा वाटतो जेथे कवी वेदना व्यक्त करताना म्हणतो-
“दर्द सहने की लत सी लगी है अब, हसते हुए जीना जरा मुश्कील है...
खुशियां आई थी राहों पर कही, मंजिल तो हम ने कुछ और ही चुनी है...”
‘वादळ’ या कवितेत वादळाला झाड, पर्वत, समुद्र व सूर्याने दिलेली उत्तरे दर्शवतात कि- ‘गर्वाचे घर नेहमी खालीच असते.’ ‘काय मागितलं काय मिळालं’ या कवितेत ‘विरोधाभास’ अलंकार जाणवतो. ‘वेडेपणा’ या कवितेनंतर नमूद एक शेर मला उद्धृत करावासा वाटतो-
“वक्त भी अजीब खेल खेलता है,
लोग फेक देते है अक्सर जिसे कोयला समजकर,
उसी को उछालकर हिरा बना देता है...” (पृष्ठ १९)
‘आज... उद्या...’ या कवितेतील पुढील ओळी भ्रष्टाचारावर टिप्पणी करतानाच मनात आत्मविश्वास निर्माण करतात-

“उद्या दगडासमोर फुलं आणतील...
आज, किंमत मोजावी लागते सही करण्याची,
एखाद्या गोष्टीवर स्वामित्व गाजवण्याची,
लोकांना किंमत नाही ह्या कष्टांची,
नाही किंमत ह्या संकल्पनांची,

उद्या, स्वाक्षरीची माझ्या ते ही किंमत मोजतील...
आता, वायफळ बड-बड बंद होईल,
जो बघत नव्हता, तोच चालून येईल,
मलाच दूर सारणारे माझे गोडवे गातील,
मला वेडं म्हणणारे जगच माझं वेडं होईल,
अजून, काहीच पैलू फक्त...” (पृष्ठ २४)

भाग-२ मधील प्रथम कविता ‘मैत्री निसर्गाशी’चे वैशिष्ट्य म्हणजे या कवितेतील प्रत्येक ओळीचा शेवट ल्+आ प्रत्ययाने होतो. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ही कविता ‘पोवाडा’ प्रमाणे वाचता व गाता येऊ शकते. पृष्ठ क्र. ३४ वर कवीने सांगितलेले “एकतर्फी प्रेम, अव्यक्त प्रेम, व्यक्त प्रेम, मित्राला/मैत्रिणीला सांगितलेलं पण तिला/त्याला माहित नसलेलं प्रेम, प्रेमात पडलेलं प्रेम, कौतुक करणारं प्रेम, वाट पाहणारं प्रेम, दुसऱ्यात देवच पाहणारं प्रेम, व्यथा असलेलं प्रेम, कथा असलेलं प्रेम, धुत्कारलेलं प्रेम, आठवणीत राहिलेलं प्रेम, आठवण झालेलं प्रेम, इत्यादी” प्रेमाचे प्रकार वाचून मी माझ्या अप्रकाशित आत्मकथनपर पुस्तक “माझी ताई:एक आठवण” मध्ये व्यक्त केलेले प्रेमविषयक विचार आठवतात. एकतर्फी प्रेमाविषयी कवी प्रणव जोशी म्हणतो- “प्रेम सर्व प्रथम एकतर्फीच होत असावं, कारण दोघांना एकमेकांवर एकाच वेळी प्रेम झालं तरी ते एकमेकांना कळेपर्यंत, सांगेपर्यंत ते एकतर्फीच राहते.” ‘ना मनाया...’ कवितेतील ‘मराठी-हिंदी-हिंदी-मराठी’ प्रमाणे ओळींची रचना कवी प्रणव जोशीची काव्यात्मक सृजनशीलता दर्शवते-

“तुझी माझी दुनियादारी, (मराठी)
भाड मी जाए दुनिया सारी,(हिंदी)
लोग भूल जायेंगे मुझे, (हिंदी)
तसं तू मला विसरू नको,” (मराठी)

व. पु. काळे यांनी हिंदी व मराठी शायरीतील सांगितलेला फरक कवी प्रणव जोशीच्या प्रगल्भ वाचनाची जाणीव करून देतो. ‘’हो’ तर म्हण’ या कवितेत प्रियकराची प्रेयसीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दिसते. ‘प्रेम-विवाद- या कवितेत दोन मित्रांमध्ये प्रेमावर संवाद आढळून येतो. या कवितेत निवडक परभाषिक शब्दांचा अपभ्रंश तर काही ग्रामीण (अप्रमाण) शब्द देखील दिसून येतात. कवितेचा शेवट प्रेम न करण्याच्या सल्ल्याने होतो. अर्थात ‘प्रेम-विवाद’ या कवितेला हास्यकविता म्हणता येईल. ‘तू ‘नाही’ म्हणालीस’ ही कविता मला आपलीशी वाटते. ‘यादों का बसेरा’ ही हिंदी रचना मनाला अलगद स्पर्श करून जाते. ‘मुहोब्बत रह गयी’ या कवितेत कवी म्हणतो-

“आज भी कोसता हुं खुद को आएने में देखकर,
तडपाता हू खुद को तेरी यादो में जी कर,
तुजसे वापस कभी ना मै मिलुंगा,
रही खुश तो तडपता रहुंगा, दुःखी तो रो पडूंगा
मगर कहता हू, ऐसे जिने में भी अलग ही मजा है,
अकेलेपण में साथ होने की सजा है
एक दुआ मांगनी थी तुजसे, जो आखिर तक रह गयी
तुझसे मुहोब्बत करनी थी खूब, जो मुझमे ही रह गयी...”

याच कवितेनंतर कवी एक शेर सादर करतो-

“कोई था जिंदगी में हमारे जिसने
मतला दिया हर लफ्ज को हमारे
दूर हो गये हमसे वो, उसी मतले के लिए
तकदीर ने कलम थमा दी...”

‘आजमाईश’ या कवितेच्या सुरुवातीला कवी म्हणतो-

“धडकन के बिना, दिल को चलाना, सिख लिया हमने,
अश्क के बिना, मुस्कुराते रोना, शीख लिया हमने.”

‘I LOVE YOU’ या इंग्रजी कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये किती मतितार्थ व प्रेम दडलेला आहे बघा-

I will not forgive myself, if you cheat,
Because, I love you…”

पृ. ५०-५१ वरील एका निनावी मराठी कवितेत discussion, fusion, confusion, conclusion, expression, frustration, relaxationexplosion या इंग्रजी शब्दांनी यमक साधलेला आहे ज्यातून कवीची प्रयोगशीलता लक्षात येते. ‘तू माझ्याविना कधी...’ या कवितेत कवीने प्रियकर व प्रेयसी कसे एकमेकांविना अधुरे (अपूर्ण) आहेट हे मार्मिक शब्दात मांडलं आहे. ‘मला तुझ्यात देव दिसतो’ ही कविता वाचून मला अलीकडे WhatsApp वर व्हायरल (सर्वत्र प्रसारीत) आचार्य प्र. के. अत्रे यांची प्रेमावरील हास्यकविता आठवते. व्यसनाधीनांना सल्ला म्हणून मी प्रणव जोशी चा एक शेर सादर करतो-

“नशा सिर्फ इश्क में नहीं होता,
जिंदगी कभी चाहो वैसे जिया करो,
जाम के तो कई प्याले पी गए आप,
कभी चाय की चुस्कीया भी लिया करो...” (पृ. ६०)

तिसऱ्या भागात ‘Superwoman’ या कवितेत कवीने एका बालकाच्या आशा-आकांक्षा व्यक्त केलेल्या आहेत. ‘तरुणाई’ या कवितेत कवी तारुण्याची भ्रमणध्वनीयंत्राशी तुलना करत म्हणतो-

“तरुणाई सुद्धा mobile handset सारखी वाटते,
स्वतःचे साधारण तर दुसऱ्याचे भारी वाटते.”

‘वास्तवता’ या कवितेची अर्धी ओळ मराठी व अर्धी ओळ हिंदीत लिहूनही कवीने कवितेचा आशय अर्थपुर्णरित्या मांडला आहे. ‘असच काहीसं करशील का गं?’ या कवितेपेक्षा मला या कवितेचा संदर्भ अधिक पसंतीस पडला. ‘अंगाई’ ही कविता आईऐवजी बापाच्या भूमिकेतून लिहिल्याने अधिक आवडली. मात्र अंगाई गीता प्रमाणे जर ही कविता लिहिली गेली असती तर वाचताना वा लयबद्धरीत्या गाताना अजून मजा आली असती असे मला वाटते. ‘बाबा चिठ्ठी पाठवतात’ ही कविता वाचकाचे मन हेलावून जाते.

भाग- ४ हा कवी प्रणव जोशीने त्यांचा सर्वाधिक आवडता असा नमूद केला असला तरी मला या भागातून नमूद करावेसे काही वाटत नाही. भाग-५ मध्ये मात्र ‘चहा’ ही कविता मला आवडली. ‘चहा’ ही कविता वाचून वाचकाचा विश्वास बसणार नाही कि सदर संग्रह अवघ्या २०-२१ वर्षीय तरुणाने लिहिला असेल!

पुस्तकातील त्रूटी:

स्वच्छंदी’ या पुस्तकातील कविता उत्तम असल्या तरी हिंदी भाषेतील कविता व शेर यामध्ये उणीव भासून येते. हिन्दी भाषेतील कवितांमध्ये काही मराठी तर मराठी कवितांमध्ये हिंदी शब्द आढळून येतात. पुस्तकात हिंदी, मराठी कवितांमध्ये भरपूर त्रूटी आहेत. अर्थात अधिकांश त्रुटींना कवीहून मुद्रक व संपादक म्हणजेच ‘शब्दांजली प्रकाशन’ जबाबदार आहे.

व्याकरण व मुद्रणदोष: हिंदी कवितांमध्ये उसी, में, आएगी, खोलने, लहरों के, समज लेते, फेरने के बजाय, तुफानोने, जहर, ओजल, मोहब्बत, संदेशा, पछ्ताएगी, रहता, जीते, होठोस्याही इत्यादी शब्दांऐवजी उसही, मैं, आयेगी, खोलते, लेहेरों, समजले ते, फेरके बजाए, तुफनोंने, जेहर, ओजर, मुहोब्बत, संदेसा, पचताएगी, रहेता, जेते, आठोसियाही असे मुद्रणदोष आढळून येतात. मराठी कवितांमध्ये सुद्धा स्व-साम्राज्यावर, प्रसन्न, राहतो, व्यक्तला, पाहत, निवांतला, मला, आल्हाद, आणून, पावसाची, पावसाळ्यात, दिलस, स्वतःची, सुखदुःखा, अवर्णनीय, आनंदाने, हळवा, नेहमी ऐवजी स्व-साम्राज्यवर, प्रसन्ना, रहातो, व्याक्ताला, पहात, निवांताला, माला, अल्हाद, अनुन, पाऊसाची, पाऊसाळ्यात, दिलसं, स्वताःची सुखादुखः, वर्णनीय, खुशीने, हलवा, नेहेमी असे मुद्रणदोष आढळतात. इंग्रजी शब्दांविषयी बोलायचे झाल्यास सिंगल ऐवजी सिंगलेopportunity ची स्पेलिंग apportunity अशी छापलेली आहे.

समीक्षकाचे मत: 

“‘स्वच्छंदी Its all about LIFE...’ या काव्यसंग्रहात कवी प्रणव जोशी यांनी एकाहून एक सरस कविता लिहिलेल्या आहेत ज्या वाचताना आनंद होतो. मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेतील कवितांचा समावेश व प्रत्येक कवितेची पार्श्वभूमी या काव्यसंग्रहाला वेगळी ओळख निर्माण करून देते. संग्रहातील सर्व कविता व शेर एकाहून एक सरस असल्या तरी पुस्तकातील क्षुल्लक मुद्रणदोष शब्दांजली प्रकाशनद्वारे नक्कीच टाळता आले असते असे वाटते. मुद्रणदोषांना प्रकाशक जबाबदार असले तरी काही मुळ शब्द देखील चुकीचे वाटतात त्यामुळे कवी प्रणव जोशी यांनी हिंदी भाषेवर अधिक लक्ष देण्याची गरज भासते. मी या पुस्तकाला ५ पैकी ३.५ तारे (गूण) देतोय.”

थोडक्यात ‘स्वच्छंदी - Its all about LIFE...’’
शिर्षक: स्वच्छंदी
उपशिर्षक: Its all about LIFE...
कवी: प्रणव जोशी
प्रकाशक: शब्दांजली प्रकाशन, पुणे
सर्वाधिकार: © प्रणव जोशी, शब्दांजली प्रकाशन
प्रथमावृत्ती: ०१/०५/२०१५
मुद्रक: कुणाल ऑफसेट, पुणे
अक्षरजुळणी: शब्दांजली, पुणे
मुखपृष्ठ: विनायक बेलोसे, पुणे
पृष्ठसंख्या: १०८ (मुखपृष्ठासहित)
विषय: काव्यसंग्रह
किंमत: ११० रु.
भाषा: मराठी, हिंदी व इंग्रजी (बहुभाषिक)
बांधणी: पृष्ठावरण
समिक्षा: © राजेश डी. हजारे (आरडीएच), आमगाव जि. गोंदिया

सूचना: सदर समिक्षेमध्ये ‘स्वच्छंदी’ या संग्रहातील निवडक उद्गार, कवितेच्या ओळी व शेर कवी प्रणव जोशी च्या पूर्वपरवानगीने फक्त संदर्भाकरीता देण्यात आलेले असून समिक्षक त्यांवर कसल्याही हक्काचा दावा करत नाही.
© सर्व हक्क समिक्षकाधीन | राजेश डी. हजारे (आरडीएच) सदर समीक्षेचे समीक्षक असल्याचा नैतिक दावा करतात.

  • प्रणव जोशी ची पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहेत.:
‘फॉल्टलाईन’ ची झलक पहाएकूण पृष्ठभेटी: 478836

No comments:

Post a Comment

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com