Pages

Sunday, 26 August 2018

शेतीवर कविता (कवी राजेश डी. हजारे 'आरडीएच') (Shetiwar Kavita)

शेतीवर कविता

कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच'


शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही


प्रत्येकजण आपल्याच कामात व्यस्त आहे
दोन वेळ खाऊन-पिऊन मस्त आहे
तरी का मग शेतकरी फस्त आहे?
की शेतकऱ्याची जिंदगी स्वस्त आहे?
रातदिस शेतात राबून 
त्याला एकवेळची भाकरी ही पचत नाही...
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही

सांगीन म्हणतो मी ही शेतकऱ्याची व्यथा
पण ऐकेल का कोणी इथे त्याची दारुण कथा?
'शेतकऱ्याचे जीणे म्हणजे 
फक्त एक कथा नाही ती एक गाथा आहे'
'दुष्काळाला कंटाळून मरणाला कवटाळून 
फासापुढे झूकणारा तो एक माथा आहे'
मॉल मध्ये टीप मोजणारे आम्ही
मंड्यांमध्ये भाव करताना 
त्याचे कष्ट कसे दिसत नाही?
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही

पाहतो मी स्वप्न 
की एक दिवस माझी कविता पूर्ण होईल
पाऊस पडो वा न पडो पीक होवो वा न होवो
शेतात राबणारा बाप माझा 
आनंदाची गाणी गायील
अंगावर कापड, ताटात भाकर, 
रहायला निवारा असेल
सुखी जीवन जगत असताना 
डोक्यावर कर्जाचा मारा नसेल
अपूर्ण असलेली 'आरडीएच' ची कविता 
तोवर पूर्ण काही होत नाही...
शेतीवर कविता लिहीन म्हणतो
पण शब्द काही सुचत नाही
एक बाप राब-राब राबतो शेतात
पण काळं कुत्रं ही त्याला पुसत नाही
======================

कवी : ©राजेश डी. हजारे 'आरडीएच'
आमगाव जि. गोंदिया
भ्रमणध्वनी क्र.: ०७५८८८८७४०१
रचना दिनांक: १८-१९ फेब्रुवारी २०१७ (शनिवार-रविवार) (१२.३५ मध्यरात्री/०६.१५ सायंकाळ)

  • काव्यवाचन  1. तीसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन , गडचिरोली (२५-२६ फेब्रुवारी २०१७ )
  2. काव्यप्रेमी मंच काव्यमहोत्सव, अक्कलकोट जि. सोलापूर (मे  २०१७ )
  3. संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत ओबीसी सेवा संघ पुरस्कृत ६ वे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलन, रविवार दि. १८ नोव्हेंबर २०१८ (तिगाव ता. आमगाव जि. गोंदिया)
  • सहभाग:
  1. शब्दविद्या राज्यस्तरीय महाकाव्यस्पर्धा  (शेतीमाती )
  2. विदर्भ शब्दविद्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धा , २६ ऑगष्ट २०१८ (परीक्षक: हनुमंत चांदगुडे )
अपडेट: २३ डिसेंबर २०१८ , रविवार (राष्ट्रीय शेतकरी दिवस)

No comments:

Post a Comment