374वा→ दिवस
069वी→ अनुदिनी
002री→ वाचकाची अनुदिनी
नमस्कार..!'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर युवा साहित्यिका स्वाती ठुबे - खोडदे यांनी एक पत्र पाठवले होते नोकरी करणा-या महिलेची व्यथा... या पत्राने फेसबुक विश्वात बरेच विक्रम केले व याला खुप प्रसिद्धीही मिळाली. त्यासंबंधी दैनिक 'लोकमत' मध्ये सोमवार दि. 30 सप्टेँबर 2013 रोजी अभिनंदनपर वृत्तही छापून आले.. स्वाती ठुबे यांच्या सहमतीने सदर पत्र मी खाली देत आहे...
1.नोकरी करणा-या महिलेची व्यथा
काल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले, नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे.

सखी आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय? आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करतो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांचे बोलणे खावे लागतात, घरचे टेन्शन, ऑफीसचे टेन्शन, दिवसभर ते रात्री झोपेपर्यंत अनामीक टेन्शनखाली वावरत असतो आम्ही.
नोकरीवाली असले तरी मी ही एक आईच आहे. नऊ महिने पुर्ण होईपर्यंत जीव मुठीत ठेवुन बाळाचे स्वप्न पहात मी प्रवास केला. तुमच्या सारखे चोचले नाही पुरवता आले. गरोदरपणात नाही आराम करता आला. तीन महीन्याचे बाळ घरी सोडुन जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बाळ घरी रडले की पान्हा आपोआप फुटायचा तेव्हा काळजाच पाणी पाणी व्हायचं. वाटायच पळत सुटावं आणि पिलाला कुशित घेवुन मनसोक्त भेटावं. पण ह्या नोकरीच्या बंधनांनी ममतेला दुर ठेवावं लागलं.
आम्ही तुमच्या बरोबर गप्पा करायला येत नाही म्हणुन आम्हाला गर्वीष्ट समजता पण तसे नाही आम्हाला वेळच नाही. अग, सखी घरी आल्यावर कधी काम आवरुन झोपेल असं होतं गं. जेव्हा नातेवाईक घरी येतात तेव्हाही आम्हाला ऑफीसला जावं लागतं. तेव्हा नातेवाईक आम्हाला माणुसकी नाही अशी पदवी देऊन जातात.
तुमच्यापेक्षा जास्त समस्या आमच्या आहेत. आम्ही ममतेला मुकतो. चार घास खाऊ घालण्याइतका वेळ आम्हाला आमच्या लेकरांना देता येत नाही. जेव्हा आमचं बाळ, आमच्या घरची माणसं आजारी असतात, तेव्हा तापलेल्या लेकराला सोडुन जाणं काय असतं हे तुम्हाला नाही कळणार.
आमचे सगळे सण ऑफीसमध्ये साजरे होतात. रस्त्याने प्रवासात आम्ही तुम्हाला पहातो तेव्हा तुम्ही नटुन थटुन चालले असतात. तेव्हा खुप चिडचिड होते. आमच्या कपडयांकडे तुम्ही पहात असता. आमच्या चांगल्या रहाण्याला शुध्द बोलण्याला आमच्या साध्या चपलांना तुम्ही फॅशन समजता. एका दिवसाच्या प्रवासाने तुम्ही दुसऱ्या दिवशी झोपुन घेता तर आमच्या रोजच्या प्रवासाचे काय? काय मजा करतो आम्ही?
उठल्यापासुन झोपे पर्यंत घडयाळाच्या काटयावर आम्ही नाचत असतो. आमची ममता आम्हाला अनेकदा रडवते आमची कर्तव्य आमच्या सावलीसारखी आमच्या बरोबर असतात. आमच्या जबाबदाऱ्या आमच्याकडुन आम्ही मशिनरी असल्यासारखे काम करुन घेतात तरीही आम्ही नोकरी करणाऱ्या मजाच मारतो हा गप्पांचा विषय का होतो सखी?
तुमचीच
No comments:
Post a Comment