Saturday 3 December 2016

#BookLysis: Fault Line (लेखक: प्रणव जोशी)- समीक्षा एका चित्तथरारक कथेची ! #Review

दिवस १५३१वा
अनुदिनी १५६ वी  
समीक्षा २७ वी
तृतीय मराठी समीक्षा

अलीकडे मी प्रणव जोशीच्या स्वच्छंदीया काव्यसंग्रहाची समीक्षा प्रकाशित करताना त्यांच्या फॉल्ट लाईनया नव्या पुस्तकाची माहिती दिली होती. प्रणव जोशीची फॉल्ट लाईनही सृजन इ-प्रकाशनद्वारा प्रकाशित इ-पुस्तक नुकतीच वाचून काढली. सदर पुस्तकाची सविस्तर समीक्षा येथे प्रकाशित करत आहे.


‘'फॉल्ट लाईन’ - समीक्षा

eBook Cover of FaultLine by Pranav Joshi #BookLysis
फॉल्ट लाईन चे मुखपृष्ठ (चित्राचे स्त्रोत: बुक हंगामा)


पुस्तकाचे बाह्यरंग:

मुखपृष्ठ (e-Book Cover): फॉल्ट लाईन च्या मुखपृष्ठावर कृष्णवर्णीय (काळी) पार्श्वभूमी असून शिर्षकाच्या अगदी मध्यभागी वर्तुळाकार चित्र आहे. वर्तुळाकार चित्र आकर्षक आणि पुस्तकाच्या विषयाला साजेसा आहे. मला समीक्षक म्हणून मुखपृष्ठ बघताना मानवाचा मेंदू व अवकाशाचे चित्र डोळ्यापुढे येतो. पुस्तकातील पात्रे डॉ. व्यास आणि मुर्तझा यांच्या मेंदूची तल्लख बुद्धिमता (आकलनशक्ती) व कहाणीचा खगोलशास्त्राशी असलेला संबंध वाचकाला मुखपृष्ठ बघताच मेंदू व अवकाशाशी साधर्म्य जोडण्यास भाग पाडतो.

शिर्षक (Title): फॉल्ट लाईन हे शिर्षक पुस्तक वाचताना पुस्तकाच्या विषयाला अनुसरून योग्य वाटते.

फॉल्ट लाईन चा परिचय (Blurb of Fault Line)


 फॉल्ट लाईन ची दृक्श्राव्यफीत पहा

अचाट कल्पना शक्तीच्या जोरावर भविष्याचा वेध घेत २१२१ अर्थात आज पासून सुमारे शंभर वर्षानंतर पृथ्वीवर काय घडत असेल याचे चित्तथरारक आणि वाचकाला खिळवून ठेवणारे वर्णन करणारी ही कादंबरी आहे.

'फॉल्ट लाईन’ विषयी लेखक प्रणव जोशी चे मनोगत: 

"फॉल्ट लाईन ह्या कादंबरीची सुरुवात साधारण १०० वर्षानंतर होते. साहजिकच आताच्या वाटचालींचा आणि घडत आलेल्या इतिहासाचा साधारण अंदाज घेऊन मी लिहायला सुरुवात केली होती, सगळे संदर्भ साधारण TOI मध्ये आलेल्या बातम्या ह्यांवरूनच घेतले आहेत. प्रसंग आणि कल्पना पूर्णपणे काल्पनिकच आहेत. इथे मला काही भविष्य बघता येत नाही आणि अंदाज तर मुळीच लावता येत नाही, तरी एक कल्पनाविलास आणि कदाचित मानव कृत्यांचे होणारे वैश्विक अंतिम परिणाम एवढंच काय ते मी सांगू शकतो. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा नियम कदाचित खूप काही थांबऊ शकला असता हेच सगळ्यांना नंतर प्रतीत होईल. ही कादंबरी वाचल्यावर अनावश्यक असणाऱ्या गोष्टींना वापरतांना किंवा उधळपट्टी करतांना एकदा तरी ह्या कादंबरीबद्दल मनात विचार यावा हीच अपेक्षा.” प्रणव जोशीपुस्तकाचे अंतरंग:


पुस्तकाचा विषय (Themes): फॉल्ट लाईन ही कादंबरी खगोलशास्त्र (विज्ञान) विषयक कल्पनाशक्तीवर आधारीत असून लेखकाने वर्तमानातील मानवी चुकांमुळे भविष्यात भारत, जग, चंद्र, मंगळ तसेच पृथ्वीवर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची कल्पना केलेली आहे.

मांडणी व स्वरूप: फॉल्ट लाईन ही ई-पुस्तक असून यातील कहाणी एकूण १८ प्रकरणात मांडलेली आहे.

भाषा: सदर पुस्तकाची भाषा मराठी असून काही ठिकाणी इंग्रजी भाषेचा उपयोग आढळतो. पुस्तकाचा विषय विज्ञानाशी संबंधित असल्याने इंग्रजी शब्दांचा वापर रास्त असला तरी पुस्तकाची मुळ भाषा मराठी व मराठी साहित्यप्रकार लक्षात घेता अगदीच सामान्य शब्द इंग्रजी ऐवजी मराठी भाषेत अधिक सुसंगत झाले असते असे मला वाटते. इंग्रजी शब्द मुळ इंग्रजी लिपीत मुद्रित करण्याऐवजी देवनागरी लिपीत इंग्रजी शब्दांचा उच्चार मुद्रित केला गेला असता तर मराठी भाषेला व मराठी साहित्यप्रकाराला अधिक न्याय मिळाला असता. असो! या पुस्तकात भाषाविषयक बऱ्याच त्रूटी आढळतात ज्या मी सदर पुस्तकाच्या नकारात्मक बाजू मांडताना नमूद केलेल्या आहेत.

लेखकाची लेखनशैली (Writing Style): फॉल्ट लाईन मध्ये प्रणव जोशीची लेखनशैली व पुस्तकातील पात्रांचे संवाद वाचनीय वाटतात. डॉ. व्यास चे नीलच्या उच्चाराकडे असलेले बारीक लक्ष लेखकाच्या निरीक्षण क्षमतेची जाणीव करून देते. ऐन पुस्तकाच्या शेवटी प्रणव जोशींनी climax मध्ये केलेला भूतकालीन तंत्र (Flashback technique) चा अनपेक्षित प्रयोग व त्यामुळे कादंबरीच्या कहाणीत अचानक निर्माण झालेला twist खरंच दाद देण्याजोगा आहे. तरीही मी पूर्वी वाचलेल्या प्रणव जोशींच्या स्वच्छंदी’ या काव्यसंग्रहातील लेखकाच्या लेखनशैलीचा दर्जा या कादंबरीत आढळत नाही.

पात्रे (Characters): खगोलशास्त्रज्ञ डॉ. व्यास, नील, मुर्तझा, मुर्तझाचे अब्बा मुनावर ही जीवंत पात्रे तसेच Max (Maximum) व C.S. (Centralised Controlled System) हे दोन रोबोट फॉल्ट लाईन या कादंबरीतील मोहिमेचे नायक आहेत. नीलची पत्नी मरीना व मुलगा तनिष्क, मुर्तझाचे अब्बा व अम्मी मुनावर आणि पाकीझा, चन्द्रप्रस्थान मोहिमेच्या समुहाचे प्रभारी शिंझो व भारताचे पंतप्रधान प्रधान (नाही अवाक् होण्याचे कारण नाही. घाबरू नका भारताचे पंतप्रधान तुम्हाला जे माहित आहेत तेच आहेत. प्रधान केव्हा पंतप्रधान झाले हे जाणण्यासाठी गुगल वर शोधून काही सापडणार नाही. हाहाहा☺) ही सहाय्यक पात्रे फॉल्ट लाईन ची कहाणी पुढे सरकवत जातात.


फॉल्ट लाईनची कथा: प्रथम प्रकरणात मांडलेली WGO (World Governing Organisation) ची संकल्पना काल्पनिक असली तरी ती मला अनुकरणीय व एक सकारात्मक संदेश देणारी वाटते. या संकल्पनेविषयी वाचत असताना सहज माझ्या मनात विचार आला की “काश! ये WGO वाली बात सच होती!” दुसरा प्रकरण मला खरंच रंजक व वाचनीय वाटतो. या प्रकरणात वर्तमानकाळातील मानवी चुकांमुळे भविष्यात भारत, जग, पृथ्वी व इतर ग्रहांवर काय परिणाम पडू शकतो याचा काल्पनिक पण तरीही अचूक वेध लेखकाने घेतललेला आहे. प्रणव जोशीच्या कल्पनाशक्तीविषयी वाचून मला आश्चर्य होतो. अर्थात यात अतीशयोक्ती आहेच आणि ती स्वाभाविकही आहे. पाचव्या प्रकरणात अरबचा अनपेक्षित प्रवेश कादंबरीत twist घेऊन येतो. सातव्या प्रकरणात डॉ. व्यास मानवी चुकांमुळे भविष्यात पृथ्वीच्या संभाव्य ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त करतात- “आपणच लोकांनी पृथ्वीला इतक्या नाजूक अवस्थेत, नाजूक परिस्थितीत आणून ठेवलं आहे की छोटा धक्का देखील १००० लोकं आज मारतो आहेच.” आठव्या प्रकरणात लेखकाने नील व मरीना चे प्रेमपूर्वक नातेसंबंध छान रेखाटलेत. दहाव्या प्रकरणात मुर्तझाचे स्वप्न व मूनावर आणि पाकीजाची अब्बू-अम्मी च्या नात्याने मुर्तझाप्रती काळजी वास्तवदर्शी वाटते. अकराव्या प्रकरणाचा शेवट खूप हृदयस्पर्शी आहे. मुर्तझाच्या चंद्रावर प्रस्थानाचा दृश्य व त्याप्रसंगी पोटच्या गोळ्याला दहा वर्षासाठी कठोर मनाने चेहऱ्यावर हास्य ठेवत कायमस्वरूपी निरोप देतानाच्या भावना मनाला स्पर्श करून जातात. सोळाव्या प्रकरणात वाचकांना अत्यंत रोमांचकारी अन् थरारक अनुभव मिळेल. सतराव्या प्रकरणात थरारासोबतच नील व मरीनाचा मनोरंजक अन् विनोदी संवाद वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चंद्रावर वास्तव्यास असताना मुर्तझाला भासलेला पृथ्वी व चंद्रावरील वास्तव्यातील फरक चंद्रावरील निरसमय जीवनाची माहिती करून देतो. शेवटच्या प्रकरणातून मला दोन उद्गार उद्धृत करावेसे वाटतात- “स्वतःच्या भविष्याचा आणि भूतकाळाचा नुसता त्रास होण्यापेक्षा माणसाने समाधानी राहावं.” “सहसा जे होणार असतं, मनुष्य त्याच्या उलट आशा ठेवतो हे माझं निरीक्षण आहे.” हे प्रकरण इतर पाठांच्या तुलनेत लांब असले तरी सुरुवातच थरारक प्रसंगाने होते. पृथ्वीच्या विनाशाचे वर्णन काल्पनिक असले तरी वास्तववादी व तितकेच भयावह अन् चिंताजनक असल्याने फक्त थरार वाचूनच अंगावर शहारे निर्माण होतात.


फॉल्ट लाईन मधील फॉल्ट (त्रुटी)


 • मुद्रणदोष: फॉल्ट लाईन या पुस्तकात मुद्रणदोषांनी अगदी कळस गाठलेला आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. माझी सवयीनूसार एकूण एक छोटे-मोठे मुद्रणदोष समीक्षेत नमूद करण्याची ईच्छा आहे. परंतू मी जर तसे करण्यास गेलो तर ही समीक्षा फक्त मुद्रणदोष नोंदीनीच भरली जाण्याची अपेक्षा नाकारता येणार नाही.
 • व्याकरणदोष: फॉल्ट लाईन या पुस्तकात असंख्य मुद्रणदोषाबरोबरच किती तरी व्याकरणदोष देखील आहेत. विरामचिन्हे अन् विशेषतः अल्पविराम, स्वल्पविराम चिन्हांची संख्या तर अधिकच आहे.
 • Spelling Mistakes: सदर समीक्षेत ‘भाषा’ विभागात नमूद केल्याप्रमाणे मराठी सोबतच फॉल्ट लाईन या कादंबरीला इंग्रजी भाषेचीही जोड आहे. खेदजनक बाब म्हणजे साधे-साधे इंग्रजी शब्द जसे patent, excite तरी चुकीची अर्थात patient, xcite अशी मुद्रित केलेली आहेत.
 • English-Marathi Google Input चा वापर: मी ठामपणे फॉल्ट लाईनच्या मुद्रणाकरीता वापरलेले फॉन्ट व लिपी सांगू शकत नसलो तरी माझ्या अनूभवानुसार मला फॉल्ट लाईनचे मुद्रण मराठी पुस्तक मुद्रणासाठी वापरले जाणारे विशिष्ठ फॉन्ट अथवा देवनागरी लिपीतील ‘कृती देव’ मालिकेतील फॉन्ट न वापरता इंग्रजी-मराठी गुगल इनपूट चा वापर केला गेल्याचे वाटते. या टूलच्या सहाय्याने मुद्रणासाठी कसलीही हरकत नाही, मात्र या टूलने मुद्रण करताना घ्यावयाची काळजी व प्रत्येक शब्द अचूक मुद्रित झाला की नाही याची खात्री मुद्रकांनी करून घेतलेली दिसत नाही.
 • ई-सृजन प्रकाशन चा निष्काळजीपणा: संपूर्ण पुस्तक वाचत असताना मला सातत्याने जाणवलं की युवा लेखक प्रणव जोशी ने इतक्या अनोख्या विषयावर मेहनतीने केलेल्या लिखाणाबद्दल ई-सृजन प्रकाशन च्या मुद्रक, संपादक (Editor) व प्रकाशकांनी हवी तितकी मेहनत घेतलेली नाही. पुस्तकाची निकृष्ठ दर्जाची अक्षरजोडणी, संपादन (Editing) आणि अगदीच सामान्य शब्दांच्या मुद्रणातही झालेल्या चुकांनी गाठलेला कळस बघता असे वाटते जणू प्रकाशकांनी लेखकाने पाठवलेली फॉल्ट लाईनची हस्तलिखित/स्वमुद्रीत प्रत (Manuscript) जशीची तशी किंवा नावापुरती दुरुस्ती करून छापली की काय? थोडक्यात फॉल्ट लाईन सारख्या दर्जेदार साहित्यकृतीला न्याय देण्यात ई-सृजन प्रकाशन अपयशी ठरले आहे.


समीक्षकाची प्रतिक्रिया:

Rajesh D. Hajare (RDH Sir)
समीक्षक राजेश डी. हजारे  (©rdhsir.com )
“‘फॉल्ट लाईन’ ही एका अनोख्या विषयावर लिखित Sci-Fi कादंबरी असून युवा लेखक प्रणव जोशीने खगोलशास्त्रविषयक संशोधन केल्याप्रमाणे या विषयाच्या प्रत्येक संभाव्य व असंभाव्य बाजूला चिंताजनक परंतू तितक्याच काळजीपूर्णरीत्या न्याय दिलेला आहे. मानव आज चंद्र आणि मंगळावर वास्तव्याचे स्वप्न पाहत असताना स्वार्थासाठी जाणीवपूर्वक आणि/अथवा अजाणतेपणे आपल्या चुकांमुळेच किंवा 'चुकांची सीमारेषा (फॉल्ट लाईन)' ओलांडल्यामुळे आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक शक्तींचा भविष्यात कशाप्रकारे ऱ्हास होऊ शकतो? आज मानव ओलांडत असलेल्या फॉल्ट लाईनचे भविष्यात कशाप्रकारे आणि किती भयावह परिणाम उद्भवू शकतात? भविष्यात जर अखिल मानवजातीसह पृथ्वीवरील संपूर्ण सजीव-निर्जीव सृष्टीचा विनाश झाला तर तो कसा होऊ शकतो आणि त्यानंतर काय परिस्थिती असेल याची अतिशयोक्ती असली तरी चिंता व्यक्त करत मानवाच्या डोळ्यात फॉल्ट लाईन न ओलांडण्याची अघोषित चेतावनी देणारी चित्तथरारक कथा म्हणजे फॉल्ट लाईन ही कादंबरी होय.”
3 of 5 Stars Rating on BookLysis by RDHSir.com

श्रेणी निर्धारण (Rating): 'फॉल्ट लाईन' या Sci-Fi कादंबरीत लेखकाने एक आगळावेगळा विषय उत्तमरीत्या हाताळला असला तरी लेखकाच्या मेहनतीच्या तुलनेत मुद्रक, संपादक व प्रकाशकांनी हवी तितकी मेहनत न घेतल्याचे जाणवते. जास्त नाही तरी किमान क्षुल्लक मुद्रणदोष मात्र संपादकांना नक्कीच टाळता/सुधारता आले असते पण ते झालेले दिसून येत नाही. फॉल्ट लाईन या कादंबरीचे दर्जेदार लेखन असले तरी ई-सृजन प्रकाशन तर्फे झालेला निष्काळजीपणा दुर्लक्ष करता येण्याजोगा नसल्यामुळे मी प्रणव जोशी यांच्या फॉल्ट लाईन या Sci-Fi कादंबरीला ५ पैकी ३ तारे देईन. खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र आणि रोबोटिक्स विषयक साहित्यात रस असणाऱ्या विज्ञानरसिक वाचकांसाठी फॉल्ट लाईन कादंबरी ही एक पर्वनीच आहे मात्र पुस्तकात प्रकाशकांद्वारा राहून गेलेल्या चुकांमुळे वाचकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


फॉल्ट लाईन अतिरिक्त माहिती


पुस्तकाचे नाव
Fault Line (फॉल्ट लाईन)
लेखक
प्रणव जोशी
ई-पुस्तक प्रकाशक
विक्रम भागवत, सृजन ड्रीम्स प्रा. लि
प्रकार
Adaptive, Encrypted e-बुक on Book Hungama
भाषा
मराठी, इंग्रजी
किंमत
५८ रुपये
ई-बुक अक्षर रचना व पुस्तक मांडणी (मुद्रक)
गिरीश जोशी, साथीदार प्रिंटर्स
ई-बुक प्रकाशन
जुलै २०१६
श्रेणी निर्धारण (Rating)
*** (५ पैकी ३ तारे, साधारण)
समीक्षक
राजेश डी. हजारे (आरडीएच)Pranav Joshi- Swachchhandi, Faultline (#BookLysis)
लेखक प्रणव जोशी (चित्राचे स्त्रोत: फेसबुक)
सूचना:
 1. सदर समीक्षेत नमूद उद्गार फॉल्ट लाईन या पुस्तकातून लेखक प्रणव जोशीच्या पूर्व परवानगीने फक्त संदर्भाकरीता घेण्यात आले असून समीक्षक पुस्तकातून घेण्यात आलेल्या कोणत्याही मजकुरावर हक्क असल्याचा दावा करत नाही.
 2. सदर समीक्षण हे लेखकाद्वारे समीक्षकाला विशेषतः समिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या ई-पुस्तकाच्या छायांकित प्रतीवरून करण्यात आलेले आहे.
 3. सदर समीक्षेतील प्रतिक्रिया ही समीक्षक राजेश डी. हजारे यांची फॉल्ट लाईन या कादंबरीविषयी निष्पक्ष प्रतिक्रिया असली तरी आपले मत समीक्षकाच्या मताशी सहमत असेलच असे बंधनकारक नाही.
 4. © सर्व हक्क समीक्षकाधीन | राजेश डी. हजारे (आरडीएच) 'फॉल्ट लाईन' च्या सदर समीक्षेचे मूळ लेखक (समीक्षक) असल्याचा नैतिक दावा करतात.
 5. समीक्षकाच्या लिखित परवानगीशिवाय 'फॉल्ट लाईन' या पुस्तकाची सदर समीक्षा मूळ स्वरुपात किंवा बदल करून निनावी किंवा मुळ समीक्षकाच्या नावात बदल करून प्रसारित केल्याचे निदर्शनास आल्यास Indian Copyright Act 1957 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
 6. (समीक्षक राजेश डी. हजारे (आरडीएच) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चे गोंदिया जिल्हाध्यक्ष आहेत.)

BookLysis वर आगामी समीक्षण

   


BookLysis वर लवकरच


पूर्व खरेदी (Pre-Order) साठी अमेझॉन वर उपलब्ध

नव्या संकेतस्थळावर भेटींचा आकडा: २४६४

3 comments:

 1. Hi, Really great effort. Everyone must read this article. Thanks for sharing.

  ReplyDelete
 2. You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information. Quality content is what always gets the visitors coming. Fault Lines

  ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com